सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️: सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले दिवंगत नायब तहसीलदार मनोज शंकर मुसळे यांच्या मुलीला त्यांच्या निधनानंतर अवघ्या २० दिवसांत अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संवेदनशीलता दाखवत या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. त्यानुसार कु. सानिका मनोज मुसळे यांना ग्राम महसूल अधिकारी पदाचा नियुक्ती आदेश देण्यात आला.
नायब तहसीलदार कै. मनोज शंकर मुसळे यांचे ११ ऑगस्ट २०२६ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीत कुटुंबाला आधार मिळावा, या उद्देशाने त्यांची मुलगी कु. सानिका मुसळे यांनी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी अर्ज केला होता.
या अर्जाची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक प्रशासकीय कार्यवाही जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून अर्ज सादर केल्यापासून अवघ्या २० दिवसांत सानिका मुसळे यांना नियुक्ती आदेश देण्यात आला.
सोमवार,२६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते कु. सानिका मुसळे यांना ग्राम महसूल अधिकारी (सजा तरंदळे, तहसीलदार कार्यालय, कणकवली) या पदाचा नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला.
शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना कठीण परिस्थितीत आर्थिक व सामाजिक आधार मिळवून देण्यासाठी अनुकंपा नियुक्तीची भूमिका महत्त्वाची असते. या प्रकरणात प्रशासकीय प्रक्रियेला संवेदनशीलता आणि तत्परतेची जोड देत जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे मुसळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
अवघ्या २० दिवसांत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करून कुटुंबाला आधार दिल्याबद्दल मुसळे परिवाराने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.