वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : वेंगुर्ला शहरातील दाभोसवाडा येथे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने साकारण्यात आलेल्या तब्बल १८ फूट उंचीच्या भव्य गणेशमूर्तीचे लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर अनावरण करण्यात आले. वेंगुर्ला नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते फीत कापून मूर्तीचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलनाने उद्घाटन सोहळ्याची सुरुवात झाली.
शौर्य प्रतिष्ठानच्या सदस्यांनी एकत्रितपणे घेतलेल्या पुढाकारातून दाभोसवाड्यात ही आकर्षक आणि भव्य गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. १८ फूट उंचीची ही मूर्ती परिसरातील नागरिकांसह गणेशभक्तांचे विशेष आकर्षण ठरत आहे. मूर्तीची निर्मिती मूर्तिकार रोशन केळुसकर यांनी केली असून, प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या सामूहिक प्रयत्नांना या माध्यमातून मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.
या अनावरण सोहळ्याला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, साई भोई, श्याम कुबल, मूर्तिकार रोशन केळुसकर, नगरसेवक सचिन शेट्ये, रवींद्र शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.
शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्याम खोबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी करण्यात आला. यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य बाळू लोणे, कामील फर्नांडिस, राजेश शेळके, कौस्तुभ आरोलकर, आग्नेल फर्नांडिस, पास्कल फर्नांडिस, विनोद आरोलकर आणि वेद फाटक यांनी विशेष मेहनत घेतली.
याशिवाय महिला सदस्य आयेशा हुले, स्वप्नाली बटवलकर, सई सातार्डेकर, वैदेही बटवलकर, सुप्रिया कोले, स्नेहल कोले, मयुरी आरोलकर, राधिका लोणे, सौ. शेळके यांच्यासह प्रतिष्ठानचे अन्य सभासद उपस्थित होते.
दाभोसवाड्यात विराजमान झालेली ही १८ फुटी भव्य गणेशमूर्ती तुळशीविवाहापर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी खुली ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वेंगुर्ला शहरासह परिसरातील गणेशभक्तांना या मूर्तीचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शौर्य प्रतिष्ठानच्या या उपक्रमातून धार्मिक श्रद्धेचा सन्मान राखतानाच सामूहिक एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि उत्सवातील लोकसहभागाचे सुंदर दर्शन घडले आहे.