कुडाळ प्रतिनिधी✍️ : सावंतवाडी एसटी बसस्थानकावर प्रवाशाचे १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या कणकवलीतील दाम्पत्याला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या चोरीचा उलगडा केला. दीपक संतोष सकट (वय २७) आणि अमृता दीपक सकट (वय २१, दोघेही रा. एस. एम. हायस्कूलमागे, किनई, कणकवली) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
सावंतवाडी एसटी बसस्थानकावरून १२ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी २१ सप्टेंबर २०२६ रोजी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना पोलिसांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सकट दाम्पत्याचा या चोरीतील सहभाग समोर आला.
यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ आणि त्यांच्या पथकाने ६ नोव्हेंबर रोजी गडनदीजवळील उभादेव मंदिर परिसरात सापळा रचला. या कारवाईत दोघांनाही शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच चोरी केलेले १२ तोळे सोन्याचे दागिने कर्नाटक येथे ठेवल्याची माहिती दिली असून, ते दागिने हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुढील तपासासाठी त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, महिला पोलीस हवालदार रुपाली खानोलकर, पोलीस हवालदार जॅकसन घोन्सालवीस आणि पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर यांचा समावेश होता.