जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

पिंगुळीचा शासकीय पाझर तलाव वाचविण्यासाठी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पिंगुळीचा शासकीय पाझर तलाव वाचविण्यासाठी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू
“

वैभव नाईक, परशुराम उपरकर आंदोलनात सहभागी; ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारण्याचा निर्धार

कुडाळ प्रतिनिधी✍️ : तालुक्यातील पिंगुळी येथील शासकीय पाझर तलावाचे संरक्षण करावे, तसेच तलावाकडे जाणारा मार्ग खुला करून संभाव्य प्रदूषण रोखावे, या मागणीसाठी पिंगुळीतील स्थानिक ग्रामस्थांनी आजपासून कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पाठिंबा दर्शविला असून माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून आंदोलनात सहभाग घेतला.




यावेळी बोलताना वैभव नाईक यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक जमिनी परप्रांतीयांकडून खरेदी केल्या जात असून, त्यानंतर स्थानिकांवर दादागिरी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वी सासोली, दाभोली येथे असे प्रकार घडले असून आता पिंगुळीतही तशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले.




पिंगुळीतील शासकीय पाझर तलावालगत एका परप्रांतीय व्यक्तीने जमीन खरेदी केली असून तलावाकडे जाणारा रस्ता दादागिरीच्या माध्यमातून आणि बॉडीगार्ड नेमून बंद करण्यात आल्याचा आरोप नाईक यांनी केला. या जागेवर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यातील सांडपाणी थेट पाझर तलावात सोडले जाण्याची शक्यता असल्याने तलावातील पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याच कारणामुळे स्थानिक ग्रामस्थांना उपोषणाचे पाऊल उचलावे लागल्याचे त्यांनी सांगितले.




या प्रश्नावर गेल्या वर्षभरापासून जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कुडाळचे आमदार मौन बाळगून असल्याची टीकाही त्यांनी केली. संबंधित जमीनमालकाला सर्व परवानग्या तातडीने कशा मिळाल्या, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. सत्ताधारी आणि संबंधित जमीनमालक यांच्यात भागीदारी असल्याची चर्चा काही लोकांकडून आपल्यापर्यंत आल्याचे सांगत, या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पिंगुळी ग्रामस्थांचे आंदोलन यशस्वी करून त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धारही वैभव नाईक यांनी व्यक्त केला.




माजी आमदार परशुराम उपरकर यांनीही या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पिंगुळीतील शासकीय पाझर तलावाच्या परिसरात गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू करून पर्यावरणाचा ऱ्हास केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित तलाव खासगी मालकीचा असल्याचे भासवून त्याची जाहिरात केली जात असून प्लॉट विक्री केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.




या तलावाच्या पाण्यावर परिसरातील सुमारे १ हजार ८५० नळधारक ग्रामस्थ अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत गृहनिर्माण प्रकल्पातील सांडपाणी तलावात मिसळल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत दूषित होण्याची भीती आहे. त्यामुळे भविष्यात परिसरातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे उपरकर म्हणाले.




एकीकडे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी वनराई बंधारे बांधून जलसंवर्धनाचे उपक्रम राबवत असल्याचे चित्र दिसत आहे, तर दुसरीकडे पिंगुळीसारख्या गावात अस्तित्वात असलेला पाण्याचा स्रोत वाचविण्यासाठी ग्रामस्थांना उपोषण करावे लागत आहे. यातून प्रशासनाच्या कामातील विसंगती स्पष्ट होत असल्याची टीका त्यांनी केली. ग्रामस्थांना न्याय न मिळाल्यास या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही परशुराम उपरकर यांनी दिला.




या आंदोलनावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, विजय प्रभू, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, रुपेश पावसकर, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, शहरप्रमुख संतोष शिरसाट, अतुल बंगे, पंचायत समिती सदस्या ममता राऊळ, माजी सरपंच नीलिमा पालकर, नीलिमा वालावलकर, सचिन ठाकूर, तुळशीदास पिंगुळकर, हेमंत पिंगुळकर, बंटी परुळेकर, संजय वेतोरेकर, बाबल गावडे, दीपक गावडे, कपिल म्हापसेकर, केतन शिरोडकर, शोहेब खुल्ली, मिलिंद परब, दीपक राऊळ, मानसी पेडणेकर, नूतन गावडे, अंकिता जाधव, ऐय्याज खुल्ली, आदेश धुरी, चेतन राऊळ, चेतन राणे, अंकु पांगुळ यांच्यासह पिंगुळीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT