कुडाळ प्रतिनिधी✍️: पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलावाच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर अखेर जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने तलाव परिसराची पाहणी केली. उपोषणाची दखल घेत विभागाचे उपअभियंता वसंत मोहिते यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा पाझर तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान तलावातील एका विहिरीत तब्बल तीन पाण्याचे पंप आढळून आल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. हे पंप तलावातील पाणी उपसून लगत सुरू असलेल्या प्रकल्पाच्या कामासाठी वापरले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
उपअभियंता वसंत मोहिते यांनी सोमवारी कुडाळ तहसील कार्यालयात उपोषणकर्त्या ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर तलाव परिसराची पाहणी केली. यावेळी पाझर तलावाच्या क्षेत्रात सुरू असलेली कथित अनधिकृत खोदाई, विहिरींमध्ये बसविण्यात आलेले पाण्याचे पंप तसेच तलावालगत सुरू असलेली बांधकामे आणि खोदकाम याबाबत ग्रामस्थांनी मोहिते यांचे लक्ष वेधले.
तलाव परिसरातील या सर्व बाबींची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे उपअभियंता मोहिते यांनी स्पष्ट केले.
तलावाचा अधिकृत नकाशाच उपलब्ध नसल्याचे उघड
दरम्यान, पाहणीदरम्यान पिंगुळी पाझर तलावाच्या हद्दीबाबतची गंभीर बाब समोर आली. पाझर तलावाचा अधिकृत नकाशाच लघु पाटबंधारे विभागाकडे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तलावाची अचूक हद्द निश्चित करण्यासाठी भूमिअभिलेख विभाग, कुडाळ यांच्याकडे यापूर्वी तीन वेळा पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, तलावाचा नकाशा उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळाले आहे.
त्यामुळे तलावाची नेमकी हद्द निश्चित करणे आणि त्या आधारे पुढील प्रशासकीय अथवा तांत्रिक कारवाई करणे अडचणीचे ठरत असल्याचे उपअभियंता मोहिते यांनी सांगितले.
२०० मीटर परिसरातील बांधकामांना परवानगी कशी?
पाझर तलावापासून हवाई अंतराच्या २०० मीटर परिसरात बांधकाम करण्यात येऊ नये, अशी तरतूद २०१८ च्या शासन निर्णयात असल्याची माहिती उपअभियंता मोहिते यांनी दिली. असे असताना तलावाच्या अगदी लगत सुरू असलेल्या बांधकामांना परवानग्या कशा देण्यात आल्या, असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
त्यामुळे संबंधित बांधकामांना देण्यात आलेल्या परवानग्या, त्यासाठी करण्यात आलेली प्रशासकीय प्रक्रिया तसेच संबंधित विभागांची भूमिका यांची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
४:६३:२० हेक्टर क्षेत्र; संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर
पिंगुळी पाझर तलावाचे एकूण क्षेत्र ४:६३:२० हेक्टर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तलावाचे मूळ क्षेत्र सुरक्षित ठेवणे, तलाव परिसरातील कथित अनधिकृत हस्तक्षेप आणि लगत सुरू असलेल्या बांधकामांचा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे.
उपअभियंता वसंत मोहिते यांच्या पाहणी अहवालात नेमके कोणते निष्कर्ष नोंदविले जातात, भूमिअभिलेख विभागाकडून तलावाची अधिकृत हद्द कधी निश्चित केली जाते आणि तलाव परिसरातील कथित अनधिकृत प्रकारांबाबत प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे उपोषणकर्ते आणि पिंगुळी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.