कुडाळ प्रतिनिधी✍️ : पिंगुळी येथील पाझर तलावाच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस होता. जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा मिळत असतानाच, तलावाशेजारी प्रस्तावित बंगला प्रकल्पावरून आमदार निलेश राणे आणि सडवेलकर यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. एकमेकांवर आर्थिक तडजोडीचे आरोप करत दोघांनीही पिंगुळी ग्रामदेवतेसमोर येऊन देवावरचे फूल उचलण्याचे आव्हान दिल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
पिंगुळी पाझर तलावाचे अस्तित्व धोक्यात येण्याची तसेच तलावातील पाणी दूषित होण्याची शक्यता व्यक्त करत ग्रामस्थांनी प्रस्तावित बंगला प्रकल्पाला विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारपासून गंगाराम सडवेलकर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यावेळी संजय वेतुरेकर आणि हेमंत देशपांडे यांनी उपोषणकर्त्यांना मार्गदर्शन केले. तलावाच्या रक्षणासाठी ग्रामस्थांनी पक्षभेद विसरून एकजुटीने लढा देण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, आमदार निलेश राणे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली. तसेच जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्यावर गंभीर आरोप करत, संबंधित बंगला प्रकल्पाच्या विकासकासोबत जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी, निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतर आर्थिक तडजोड केल्याचा दावा केला. आपले आरोप खोटे असतील तर सडवेलकर यांनी पिंगुळी ग्रामदेवतेसमोर येऊन देवावरचे फूल उचलून सत्य स्पष्ट करावे, असे आव्हान राणे यांनी दिले.
आमदार राणे यांच्या आरोपांना गंगाराम सडवेलकर यांनीही व्हिडिओद्वारे प्रत्युत्तर दिले. आर्थिक तडजोडीचे आरोप फेटाळून लावत त्यांनी उलट प्रस्तावित बंगला प्रकल्पामध्ये राणे परिवाराचीच आर्थिक भागीदारी असल्याचा आरोप केला. आपला आरोप खोटा असल्याचे सिद्ध करण्यासाठी आमदार निलेश राणे यांनीही पिंगुळी ग्रामदेवतेसमोर येऊन देवावरचे फूल उचलावे, असे प्रतिआव्हान सडवेलकर यांनी दिले.
या आंदोलनाला माजी आमदार वैभव नाईक, अमित सामंत, धीरज परब, अभय शिरसाट यांच्यासह पिंगुळीतील ग्रामस्थ, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
एकीकडे पिंगुळी पाझर तलावाच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना दुसरीकडे या विषयाला राजकीय आरोप-प्रत्यारोपांची किनार लाभली आहे. आर्थिक भागीदारीच्या आरोपांवरून दोन्ही नेत्यांमध्ये सुरू झालेल्या आव्हान-प्रतिआव्हानामुळे पिंगुळीतील वातावरण चांगलेच तापले असून, या संपूर्ण प्रकरणाकडे आता कुडाळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.