जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

अभ्यासू उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर गप्प का? संजू परबांचा सवाल

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

अभ्यासू उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर गप्प का? संजू परबांचा सवाल
“

इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील गाळे, पोटभाडेकरू, खड्डे आणि मोती तलावाच्या कामावरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या भिंती पाडण्याचे प्रकरण आणि पोटभाडेकरूंच्या प्रश्नावर उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर ठोस भूमिका का घेत नाहीत? स्वतःला अभ्यासू म्हणवून घेणारे उपनगराध्यक्ष या विषयावर गप्प का आहेत? त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? असे सवाल उपस्थित करत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी सावंतवाडी नगरपरिषदेतील सत्ताधारी आणि प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका केली. नगरपरिषदेत सध्या पोरखेळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेविका ॲड. नीता सावंत-कविटकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक आणि नगरसेवक देव्या सूर्याजी उपस्थित होते.




इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या भिंती काढण्याच्या प्रकरणावर बोलताना संजू परब म्हणाले की, प्रशासनाच्या माहितीनुसार सुमारे २० गाळेधारकांनी भिंती काढल्या असून या प्रकाराला तब्बल २५ वर्षे झाली आहेत. प्रशासनाने या प्रकरणाचे ऑडिट करून केवळ दंड वसूल केला; मात्र प्रत्यक्ष कारवाई का केली नाही? संबंधित गाळेधारकांकडून पुन्हा भिंती बांधून घेणे आवश्यक होते. मग हा विषय बैठकीत आणून नेमके काय साध्य झाले? या संपूर्ण प्रकरणावर उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट का केली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.




अधिकृत भाडेकरूंकडून गाळे पोटभाड्याने दिले जात असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. प्रशासनाकडे पोटभाडेकरूंची यादी उपलब्ध असतानाही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. मूळ भाडेकरू पोटभाडेकरूंकडून दरमहा २० हजार रुपये भाडे घेतात, तर नगरपरिषदेला केवळ दीड हजार रुपये मिळतात. त्यामुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान होत आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर संबंधित गाळ्यांच्या भिंती तातडीने बांधून घ्याव्यात आणि ते गाळे ताब्यात घेऊन बेरोजगार तरुणांना उपलब्ध करून द्यावेत, असे आव्हान परब यांनी दिले.




पाणीपुरवठा सभापतींना क्लिनचीट देण्याचा अधिकार कुणाला?




पाणीपुरवठा सभापतींना निर्दोष ठरविण्याच्या भूमिकेवरही संजू परब यांनी आक्षेप घेतला. चौकशी समिती नेमण्यात आली असताना संबंधित सभापतींना निर्दोष असल्याचे घोषित करण्याचा अधिकार सभागृहाला किंवा नगराध्यक्षांना आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्याधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमल्याचे सांगितले असताना सभापतींनी राजीनामा द्यावा आणि चौकशीत निर्दोष सिद्ध झाल्यानंतर त्यांना पुन्हा पदावर घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. विरोधी पक्षातील काही नगरसेवकांनी या क्लिनचीटला पाठिंबा देणे दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले. नगरपरिषदेत अभ्यासपूर्ण चर्चा करण्याची आमच्या पक्षाची तयारी आहे. कुणीही आमच्याशी समोरासमोर चर्चा करावी, असे खुले आव्हान त्यांनी दिले.




विनाटेंडर खड्डे भरण्याच्या कामावर आक्षेप




शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे विनाटेंडर भरल्याच्या मुद्द्यावरही परब यांनी प्रशासनाला धारेवर धरले. टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच खड्डे भरण्याचे काम सुरू करण्याची ही कोणती पद्धत आहे? नगराध्यक्ष आदेश देऊ शकतात; मात्र काम नियमानुसार निविदा काढूनच झाले पाहिजे. उद्या एक लाख रुपयांच्या कामाचे बिल दोन लाख रुपये झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? नगरपरिषदेत भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना पुन्हा अशा प्रकारे कामे केली जात आहेत. अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने कामे करू नयेत, असा इशाराही त्यांनी दिला.




मोती तलावाच्या कामावर नाराजी; पालकमंत्री आणि आमदारांचे लक्ष वेधणार




मोती तलावाच्या सुरू असलेल्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना संजू परब म्हणाले की, तलावाचे सध्या सुरू असलेले काम आपल्याला अजिबात मान्य नाही. हा केवळ एखादा दोष नसून मुळापासून दूर करण्याची गरज असलेला प्रश्न आहे. यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे.




मोती तलाव हा सावंतवाडीचे हृदय आहे. मात्र, या हृदयालाच कॅन्सर झाला असून त्यावर उपचार करण्यासाठी योग्य डॉक्टरांची आवश्यकता आहे. सत्तेत बसलेले डॉक्टर हा आजार बरा करू शकणार नाहीत. ते खोटी सर्टिफिकेट घेऊन डॉक्टर झाले आहेत, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर उपरोधिक टीका केली.




चौकशी पूर्ण होण्यापूर्वी निर्दोष ठरविणे अयोग्य – ॲड. नीता सावंत-कविटकर




नगरसेविका ॲड. नीता सावंत-कविटकर यांनीही पाणीपुरवठा सभापतींच्या प्रकरणावर भूमिका मांडली. चौकशी समिती नेमलेली असताना संबंधितांना निर्दोष ठरविण्याचा अधिकार सभागृहाला नाही. भ्रष्टाचार झाला नाही, असा निष्कर्ष चौकशी पूर्ण होण्यापूर्वी काढणे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या.




या प्रकरणातील बिलांची फाईल आमच्या नगरसेविकांनी रोखली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी करताना समितीमध्ये मुख्याधिकाऱ्यांचा समावेश करू नये, अशी भूमिका मांडली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीची दखल घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेणार आहोत. या संपूर्ण प्रकरणात केवळ जोडारी यांनाच बळीचा बकरा बनवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.




आडाळी एमआयडीसीची वीजवाहिनी भूमिगत करण्यास मंजुरी




दरम्यान, आडाळी एमआयडीसीसाठी इन्सुली सबस्टेशन ते आडाळी अशी ३३ केव्ही वीजवाहिनी बांदा शहरातून टाकण्याचे नियोजन होते. या वीजवाहिनीमुळे संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी या कामाला विरोध केला होता. या प्रश्नावर संजू परब यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली.




या भेटीनंतर संबंधित तीन किलोमीटरची वीजवाहिनी भूमिगत करण्यास मंत्री उदय सामंत यांनी मान्यता दिली आहे. या प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल संजू परब यांनी मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.




एकीकडे नगरपरिषदेतील विविध कामांवरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारताना दुसरीकडे आडाळी एमआयडीसीच्या वीजवाहिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती संजू परब यांनी या पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे सावंतवाडी नगरपरिषदेतील गाळे, पोटभाडेकरू, पाणीपुरवठा आणि मोती तलावाच्या प्रश्नांवर आगामी काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी

ANCHOR AD SLOT