कुडाळ प्रतिनिधी✍️ : पिंगुळी गावाची जीवनवाहिनी असलेल्या ऐतिहासिक पाझर तलावाच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी उभारलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. पाझर तलावाच्या संरक्षणासह देऊळवाडी येथील सर्वे क्रमांक २८/१ आणि २८/२ मधील २७५ भूखंडांच्या लेआउटला दिलेली अंतिम रेखांकन परवानगी रद्द करणे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले बेमुदत उपोषण पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले. प्रभारी उपविभागीय अधिकारी सचिन पाटील यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर सडवेलकर यांनी लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडले. या निर्णयानंतर ग्रामस्थांनी कारीट फोडून आणि पोहे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
पिंगुळी पाझर तलाव परिसरात प्रस्तावित असलेल्या बंगलो प्रकल्पामुळे ऐतिहासिक तलावाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. तसेच प्रकल्पातील सांडपाण्यामुळे तलावाचे पाणी दूषित होण्याची शक्यता असून, तलावाकडे जाणारे पारंपरिक रस्ते विकासकाने बंद केल्याचा आरोपही करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर तलावाचे संरक्षण, शेतकऱ्यांच्या वहिवाटीचे रस्ते खुले करणे आणि संबंधित बांधकामाला स्थगिती देणे अशा विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी कुडाळ उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते.
उपोषणकर्ते आणि प्रशासन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाने संबंधित विकासकाला काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. याबाबतचे लेखी पत्र प्रभारी उपविभागीय अधिकारी सचिन पाटील यांनी उपोषणकर्ते गंगाराम सडवेलकर यांना सुपूर्द केले.
या पत्रानुसार, स्थानिक शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या रस्त्यांवर त्यांना वापरण्यास कोणताही अडथळा निर्माण करू नये. असे रस्ते बंद केले असल्यास ते तात्काळ खुले करून द्यावेत. पाझर तलावातील पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असल्याने ते कोणत्याही प्रकारे प्रदूषित होणार नाही, याची योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच लगतचे सार्वजनिक पाण्याचे स्रोत आटणार नाहीत किंवा त्यांना कोणतीही बाधा पोहोचणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय संबंधित मिळकतीमध्ये सुरू असलेली बांधकामे वरील मुद्द्यांच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही होईपर्यंत स्थगित ठेवण्याचे निर्देशही विकासकाच्या अधिकृत प्रतिनिधीला देण्यात आले आहेत.
प्रभारी उपविभागीय अधिकारी सचिन पाटील यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन गंगाराम सडवेलकर यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी 'पिंगुळी एकजुटीचा विजय असो' अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला. कारीट फोडून आणि पोहे वाटून या यशाचा जल्लोष करण्यात आला.
यावेळी बोलताना गंगाराम सडवेलकर यांनी या लढ्याला सहकार्य करणारे ग्रामस्थ, प्रशासन, सर्व लोकप्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी, पत्रकार आणि आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले. सर्वांच्या एकजुटीमुळे आणि सहकार्यामुळेच हा लढा यशस्वी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र, आमदार नीलेश राणे यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांची खंत कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, प्रभारी उपविभागीय अधिकारी सचिन पाटील, संजय वेतुरेकर आणि हेमंत देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी धीरज परब, अभ्या शिरसाट, विजय प्रभू यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
पिंगुळीच्या ऐतिहासिक पाझर तलावाच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट आणि पाच दिवसांच्या संघर्षानंतर मिळालेले लेखी आश्वासन यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.