सिंधुदुर्ग प्रतिनिधी✍️ : जिल्ह्यातील एसआयआरच्या कामकाजाचा आढावा व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मालवण तालुक्यातील ओवळीये येथे सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामात प्रत्यक्ष सहभाग घेत श्रमदान केले. जिल्ह्यात लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या जलसंधारणाच्या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा देत काही काळ वनराई बंधारा बांधण्याच्या कामात सहभाग नोंदविला.
ओवळीये येथे पूर्ण झालेल्या वनराई बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचे चोक्कलिंगम यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासाठी अशा प्रकारच्या जलसंधारणाच्या कामांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणी अडविणे, पाणी जिरविणे तसेच उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन व बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने प्रशासनाच्या पुढाकारातून विविध भागांत जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग आणि श्रमदानाला विशेष प्राधान्य दिले जात आहे. वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यास मदत होते. त्यातून भूजल पातळीत वाढ होण्यासोबतच विहिरींमधील पाणीसाठा वाढण्यास आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता कायम राखण्यास मदत होते. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमुळे जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक होण्यास हातभार लागत आहे.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी परगिणी पाटील, तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर, पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण, सरपंच रंजना पडवळ तसेच शेतकरी संतोष कदम उपस्थित होते.
ओवळीये येथील भेटीदरम्यान चोक्कलिंगम यांनी काजू प्रक्रिया उद्योगालाही भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली.