वेंगुर्ला स्वरूपा सौदागर ✍️: भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त नगर वाचनालय, वेंगुर्ले या संस्थेतर्फे १५ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संस्थेच्या लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात सायंकाळी ३.३० वाजता वेंगुर्ले तालुक्यातील इयत्ता ५वी ते ७वी आणि इयत्ता ८वी ते १२वी या दोन गटांतील विद्यार्थ्यांसाठी ‘मला आवडलेले पुस्तक’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धेतील ५वी ते ७वी या पहिल्या गटात प्रथम क्रमांक कु. माधव श्रीपाद ओगले (पुस्तक : बोक्या सातबंडे), पू. प्रा. शाळा, वेंगुर्ले नं. २; द्वितीय क्रमांक शर्व बाबुराव आपटे (पुस्तक : माझी जन्मठेप), वेंगुर्ला हायस्कूल; तर तृतीय क्रमांक कु. आयुष केदार पवार (पुस्तक : छावा), सिंधुदुर्ग विद्यानिकेतन यांनी पटकावला.
८वी ते १२वी या दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक कु. भार्गवराम श्रीपाद ओगले (पुस्तक : फिरुन नवी जन्मले मी), रा. कृ. पाटकर हायस्कूल; द्वितीय क्रमांक कु. ईशा आरोलकर (पुस्तक : अग्निपंख), रा. कृ. पाटकर हायस्कूल; तर तृतीय क्रमांक कु. सोहम ढवळ (पुस्तक : महाभारत) आणि कु. दुर्वा महेश गांवकर (पुस्तक : हे विश्वची माझे घर), रा. कृ. पाटकर हायस्कूल यांनी संयुक्तपणे मिळविला.विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी सांगितले की, नगर वाचनालयातर्फे डिसेंबर महिन्यात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यासाठी अधिक तयारी करून सहभागी व्हावे आणि वेंगुर्ले तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांनी काही स्पर्धकांना वैयक्तिक मार्गदर्शन करून त्यांच्या वक्तृत्वातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या.
स्पर्धेचे परीक्षण विठ्ठल उर्फ भाऊ करंगुटकर, कैवल्य पवार आणि महेश बोवलेकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर, उपकार्यवाह सौ. माया परब, कार्यकारी मंडळ सदस्य सौ. मंगल परुळेकर, तसेच श्रीनिवास सौदागर, श्रीमती अ. ग. खानोलकर, श्रीमती वैभवी रायशिरोडकर, रमेश नार्वेकर, श्री. मयेकर, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचनाची आवड, वक्तृत्वकौशल्य आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.