तुळस प्रतिनिधी✍️: महिलांनी आत्मविश्वासाने नेतृत्वाची धुरा स्वीकारून ग्रामविकासाच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा. गावातील स्थानिक प्रश्न समजून घेत त्यांच्या निराकरणासाठी पुढाकार घ्यावा तसेच लोकहिताच्या निर्णयांमध्ये आपले मत ठामपणे मांडावे, असे आवाहन प्रमुख वक्त्या प्रगती चव्हाण यांनी केले.
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग–तुळस आणि कोकण विकास संस्था, पणजी (गोवा) यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस येथे महिला मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. तुळस, मठ, पाल, मातोंड आणि होडावडे या पाच गावांतील सुमारे ८० महिलांनी शिबिरात सहभाग घेतला.
पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, कोकण विकास संस्था, पणजीचे उपक्रम समन्वयक राजेंद्र कांबळे, प्रमुख वक्त्या प्रगती चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सभापती शंकर घारे आणि जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ यांनी मनोगत व्यक्त करून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
राजेंद्र कांबळे यांनी उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करताना महिलांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि ग्रामविकासाच्या निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग अधिक प्रभावी करणे, यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता नेतृत्वासाठी आवश्यक
‘महिला नेतृत्व, आत्मविश्वास व निर्णयक्षमता’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रगती चव्हाण यांनी प्रभावी नेतृत्वासाठी आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव, योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि पुढाकार घेण्याची वृत्ती आवश्यक असल्याचे सांगितले. नेतृत्व म्हणजे केवळ एखादे पद भूषविणे नव्हे, तर जबाबदारी स्वीकारून लोकांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांच्या निराकरणासाठी सातत्याने प्रयत्न करणे होय, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिलांनी ग्रामसभांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून स्थानिक प्रश्नांवर आपली भूमिका मांडावी. विकासकामांच्या नियोजनातही त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कोणताही निर्णय घेताना उपलब्ध माहितीचा अभ्यास, विविध पर्यायांचा विचार, सामूहिक चर्चा आणि लोकहिताला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यांसह विविध विकासविषयक प्रश्नांच्या निराकरणात महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. स्थानिक समस्यांचा महिलांना प्रत्यक्ष अनुभव असल्याने त्यांच्या अनुभवाचा उपयोग ग्रामविकासासाठी होणे आवश्यक आहे. त्यामुळे महिलांनी केवळ सहभागी न राहता निर्णयप्रक्रियेतही सक्रिय भूमिका बजावावी, असे चव्हाण यांनी अधोरेखित केले.
महिला नेतृत्व सक्षम करण्याचा प्रयत्न
महिलांमधील नेतृत्वगुण विकसित करणे, निर्णयप्रक्रियेतील त्यांचा सहभाग वाढविणे आणि ग्रामविकासातील त्यांची भूमिका अधिक सक्षम करणे, हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता. नेतृत्व, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता या विषयांवर मार्गदर्शन करून महिलांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग वाढविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन वासुदेव परुळकर यांनी प्रास्ताविक केले. सानिया वराडकर यांनी आभार मानले.