कुडाळ प्रतिनिधी✍️ : सिंधुदुर्गातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासोबतच त्यांच्यासाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने भविष्यात जिल्ह्यात मेणबत्ती निर्मितीचा क्लस्टर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी घोषणा फाईन आर्टिस्ट व क्राफ्ट ट्रेनर सौ. नंदिनी रामचंदानी यांनी कुडाळ येथे केली.
कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिक आणि आश्रय प्रतिष्ठान, कुडाळ एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार निर्मिती व रोजगार हमी योजनेअंतर्गत महिलांसाठी दोन दिवसीय विविध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शिवाजीनगर येथील दैवज्ञ समाज भवनात करण्यात आले होते. या शिबिरात नाशिक येथील सौ. नंदिनी रामचंदानी यांनी महिलांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनीता मोडक यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना नंदिनी रामचंदानी यांनी सांगितले की, कोकणातील महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज आहे. त्यासाठी उपलब्ध प्रशिक्षण अभ्यासक्रमांची माहिती घेऊन त्यातून तयार होणाऱ्या वस्तूंना योग्य बाजारपेठ कशी मिळवून देता येईल, यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जिद्द, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर महिलांनी मेणबत्ती निर्मितीच्या क्लस्टर उभारणीच्या दिशेने पुढाकार घ्यावा. या उपक्रमासाठी आपले आवश्यक ते सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
डॉ. सुनीता मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाच्या विविध योजना व उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहणार असल्याचेही रामचंदानी यांनी स्पष्ट केले.
विविध हस्तकला निर्मितीचे प्रशिक्षण
दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात फॅब्रिक पेंटिंगमध्ये कापडासाठी योग्य रंगांची निवड, ब्रश हाताळण्याची पद्धत, विविध चित्रकला तंत्रे, फुलांची पारंपरिक व आधुनिक डिझाइन्स, स्टेन्सिल पद्धत, रंगांचे मिश्रण, शेडिंग तसेच कापडावर रंग अधिक काळ टिकण्यासाठी आवश्यक तंत्रांची माहिती देण्यात आली.
यासोबतच रेझिन ट्रे, कोस्टर, कीचेन, फोटो फ्रेम, आरती थाळी, पिलर व स्तंभाकार मेणबत्त्या, फॅन्सी दिवे, लाडू मेणबत्त्या आणि सुगंधी जार मेणबत्त्या तयार करण्याची प्रात्यक्षिके घेण्यात आली. पिलो बॉक्स, स्लाइडिंग बॉक्स, पेपर बॉक्स, ड्रॉवर बॉक्स, षटकोनी बॉक्स, विंडो बॉक्स, कागदी पिशव्या आणि लिफाफे तयार करण्याचेही प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.
या प्रसंगी आश्रय प्रतिष्ठानचे माधव गोरे, मणिकर्णिका संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष उन्मेषा दाभोलकर, सतीश पाथरूट, श्री. दाभोलकर, ज्येष्ठ महिला उद्योजिका रेश्मा जळवी, शिवप्रेमी प्रतिष्ठानचे विवेक पंडित, रमाकांत नाईक, मृणाल सावंत, कीर्ती पाटील, प्रियांका सुकाळे, उमेश दाभोलकर, स्वाती पेडणेकर, मंगेश राऊत, पूजा कुडव, सानिका सावंत, स्वप्नाली जळवी, दर्शना धुरी, दर्शना मार्गी, वृंदा राऊत, गोविंद जळवी, दीपेश मांजरेकर, हरेश घाडी, दुर्वांकुर घाडी आणि ओंकार पाटील आदी उपस्थित होते.
महिलांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण शिबिर उपयुक्त ठरले.