मुंबई प्रतिनिधी✍️: जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा क्षेत्रातील इस्माईल युसूफ शासकीय महाविद्यालयाची पाहणी आज, २ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी आमदार अनंत (बाळा) नर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या तसेच आवश्यक शैक्षणिक, क्रीडा व पायाभूत सुविधांबाबत मंत्री महोदयांशी सविस्तर चर्चा केली.
महाविद्यालयाच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार नर यांनी विविध मागण्या यावेळी मांडल्या. यामध्ये महाविद्यालयातील क्रीडा संकुल सर्व सुविधांसह कार्यान्वित करणे, विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देणे, दोन्ही प्रवेशद्वारांचा पुनर्विकास व सुशोभीकरण करणे, तसेच व्हॉलीबॉल मैदान आणि बॅडमिंटन कोर्टची सुधारणा करण्याच्या मागण्यांचा समावेश आहे.
तसेच महाविद्यालयातील सफाई कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविणे, खेळाच्या मैदानाचा विकास करून आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध करणे, महाविद्यालयाचा मुख्य रस्ता तसेच शिक्षण निरीक्षक कार्यालयाजवळील रस्त्याचे बांधकाम करणे, जुन्या संरक्षण भिंतीची दुरुस्ती व पुनर्बांधणी करणे, पर्जन्य जलवाहिनीची सुविधा उपलब्ध करून देणे आणि महाविद्यालयाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणीही करण्यात आली.
वसतिगृहाच्या मागणीबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या आणि प्रत्यक्ष गरज लक्षात घेऊन वसतिगृहाबाबत आवश्यक कार्यवाही करता येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच स्थानिक खेळाडूंना महाविद्यालयातील क्रीडांगण विनामूल्य वापरण्यास उपलब्ध करून द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
महाविद्यालयातील विविध समस्यांबाबत येत्या आठ दिवसांत आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले. तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना सुरक्षित, दर्जेदार आणि सुविधायुक्त शैक्षणिक वातावरण मिळण्याबरोबरच आधुनिक शैक्षणिक व क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आमदार अनंत (बाळा) नर यांनी या सर्व मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका मांडली.
विद्यार्थ्यांच्या सुविधा, महाविद्यालयाचा विकास आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.