वेंगुर्ला प्रतिनिधी ✍️: गावाची अस्मिता जपण्यासाठी,जमिनीचे संरक्षण करण्यासाठी आणि गावाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा गावातील तरुणांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.गावातील जमिनीचे व्यवहार पारदर्शक व्हावेत,अनधिकृत बांधकामांना आळा बसावा आणि भूमिपुत्रांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे,या उद्देशाने गावातील वाडी-वाडीत जनजागृती फलक लावून जागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
‘गावाची जमीन गावातच राहिली पाहिजे!’ हा ठाम संदेश देत परप्रांतीय व्यक्तींना जमिनीची विक्री करू नये,तसेच नियमबाह्य पद्धतीने कोणालाही इमारत क्रमांक देण्यात येऊ नये,अशा मागण्या या फलकांच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. गावाच्या हिताशी संबंधित प्रश्नांवर ग्रामस्थांनी जागरूक राहावे आणि गावाच्या जमिनींचे महत्त्व ओळखून त्यांचे संरक्षण करावे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.जमीन व्यवहार पारदर्शक करण्याची मागणी गावातील जमिनींचे व्यवहार पारदर्शक पद्धतीने व्हावेत, इमारत क्रमांक देताना कायदेशीर नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे आणि अनधिकृत प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा या जनजागृती मोहिमेतून व्यक्त करण्यात आली आहे.गावातील जमीन व्यवहार आणि इमारत क्रमांक देण्याच्या प्रक्रियेबाबत नियमांची अंमलबजावणी व्हावी,यासाठी तरुणांनी हा विषय ऐरणीवर आणला आहे.गावाच्या अस्मितेसाठी तरुणांची एकजूट गाव म्हणजे केवळ घरे आणि जमिनी नव्हेत,तर गावाची संस्कृती,परंपरा,सामाजिक एकोपा आणि पुढील पिढ्यांसाठी जपून ठेवायचा अमूल्य वारसा आहे.हा वारसा सुरक्षित ठेवण्यासाठी उभादांडा गावातील तरुणांनी एकत्र येत जनजागृतीचा मार्ग स्वीकारला आहे.गावातील प्रश्नांबाबत ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण करणे,तसेच प्रशासनाला कायद्याचे पालन करण्याची आठवण करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.‘गावाची माती,गावाची अस्मिता आणि पुढील पिढ्यांचे भविष्य जपणे ही सामूहिक जबाबदारी!’ गावाचा विकास व्हावा, प्रत्येकाला कायद्यानुसार न्याय मिळावा आणि गावाच्या हिताशी संबंधित निर्णय पारदर्शक पद्धतीने घेतले जावेत,यासाठी तरुणांची एकजूट महत्त्वाची ठरत आहे.उभादांड्यात सुरू झालेल्या या जनजागृती मोहिमेमुळे गावातील जमीन व्यवहार,इमारत क्रमांक देण्याची प्रक्रिया आणि भूमिपुत्रांच्या हक्कांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
गावाची जमीन,गावाची संस्कृती आणि गावाची अस्मिता जपण्यासाठी उभादांड्यातील तरुणांनी उचललेले हे पाऊल गावाच्या भवितव्याबाबत जागरूकता निर्माण करणारे ठरत आहे.