मुंबई प्रतिनिधी✍️ : महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या कार्याचा वारसा पुढे नेणे आवश्यक असून, त्यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त पुण्यातील ऐतिहासिक फुलेवाडा आणि भिडेवाडा परिसरातील सुशोभीकरण व विकासकामे तातडीने पूर्ण करण्यासाठी गती द्यावी, असे निर्देश महसूल मंत्री तथा ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे महानगरपालिकेला दिले.
मंत्रालयात झालेल्या ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपसमितीचे सदस्य तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे (ऑनलाईन) उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेने फुलेवाडा परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार केलेल्या प्रस्तावाचा बैठकीत आढावा घेण्यात आला. फुलेवाडा आणि भिडेवाडा या ऐतिहासिक स्थळांच्या विकासकामांना प्राधान्य देऊन ती वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना बावनकुळे यांनी दिल्या.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची उभारणी
राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारण्याच्या दृष्टीने १२ ठिकाणी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. उर्वरित १५ ठिकाणी नाममात्र एक रुपया दराने जागा उपलब्ध करून देण्याची योजना तयार करावी. सर्व जिल्ह्यांमध्ये वसतिगृहांसाठी जागा निश्चितीची प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करावी, असे निर्देशही बावनकुळे यांनी दिले. मुंबई शहरातही वसतिगृहांसाठी जागा उपलब्ध करून घेण्यास प्राधान्य देण्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक वसतिगृहात सुमारे ५०० विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था होईल, अशा पद्धतीने आराखडा तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
फुले यांच्या नावाने योजना राबविण्याच्या सूचना
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दुष्काळ निवारणासाठी कार्यरत असलेल्या संबंधित आठ विभागांनी महात्मा फुले यांच्या नावाने योजना तयार करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, कलिना येथे फुले, शाहू, आंबेडकर इंटरनॅशनल ग्रंथालयाचे काम पूर्ण झाले असून, त्याच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री यांना निमंत्रित करावे, अशी सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी केली. राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये महात्मा फुले अध्यासन केंद्र स्थापन करावे, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये त्यांच्या साहित्याचा समावेश करावा तसेच त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती किंवा फेलोशिप सुरू करावी, अशा सूचनाही त्यांनी मांडल्या. महिला सक्षमीकरणासाठी विशेष महिला योजना सुरू करण्याबाबतही त्यांनी आग्रह धरला.
भटक्या-विमुक्तांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतुदीची मागणी
भटक्या-विमुक्त जाती-जमातींच्या विकासासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय लेखाशीर्ष असावे. तसेच व्हीजेएनटीसोबतच ओबीसी आणि एसबीसी घटकांसाठी आधार योजनेतील भत्त्यात वाढ करावी, अशी मागणी मंत्री अतुल सावे यांनी बैठकीत केली.
आगामी डिसेंबर महिन्यात भटक्या-विमुक्त घटकांसाठी स्वतंत्र निधीची मागणी वित्त विभागाकडे करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली.
बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, ओबीसी विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.