मुंबई प्रतिनिधी✍️: पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर परिसरात जागतिक दर्जाचा आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय कृषी बाजार उभारण्याच्या दृष्टीने सिंगापूरमधील गुंतवणूकदार, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था तसेच धोरणात्मक भागीदारांकडून गुंतवणूक मिळविण्यासाठी डीबीएस बँकेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे डीबीएस बँक आणि आयआयकेअर फाउंडेशनच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत मंत्री रावल यांनी विविध विषयांवर चर्चा केली. प्रस्तावित कृषी बाजारामध्ये एकात्मिक शीतसाखळी, अत्याधुनिक अन्नप्रक्रिया केंद्रे, गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था तसेच जागतिक बाजारपेठेशी थेट जोडणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. यामुळे कृषी व्यापार आणि कृषी निर्यातीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
हवामान बदलाचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी नदी पुनरुज्जीवन, शाश्वत जलव्यवस्थापन, भूजल पुनर्भरण, दुष्काळ निवारण आणि हवामानास अनुकूल शेती यांसाठी आंतरराष्ट्रीय हरित वित्तपुरवठा व आधुनिक तंत्रज्ञानाचे सहकार्य मिळविण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे रावल यांनी सांगितले.
प्रगत सिंचन व्यवस्था, अचूक शेती तंत्रज्ञान, दुष्काळरोधक पिके, आधुनिक गोदामे, शीतसाखळी आणि कृषी प्रक्रिया उद्योगांमध्ये गुंतवणूक झाल्यास काढणीनंतर होणारे नुकसान कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन कृषी क्षेत्राला अधिक बळकटी मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती आणि नांदेड यांसारख्या शहरांमध्येही गुंतवणुकीच्या संधी वाढवाव्यात. त्यातून प्रादेशिक विकासासोबतच रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल, असे आवाहन मंत्री रावल यांनी केले.
परकीय गुंतवणूक, हरित वित्त आणि ग्रामीण आरोग्यासाठी त्रिपक्षीय करार
महाराष्ट्र शासन, डीबीएस बँक इंडिया लिमिटेड आणि आयआयकेअर फाउंडेशन यांच्यात थेट परकीय गुंतवणूक, जागतिक क्षमता केंद्रांची निर्मिती, हरित वित्तपुरवठा, तंत्रज्ञानाधारित नवकल्पना तसेच ग्रामीण आरोग्यसेवेच्या विकासासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला.
वाढवण येथील प्रस्तावित कृषी बाजाराच्या विकासासोबतच हवामान बदलाला तोंड देणारी शेती, प्रादेशिक पायाभूत सुविधा आणि स्थानिक पातळीवरील रोजगारनिर्मिती यासाठी आंतरराष्ट्रीय भांडवल, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक कौशल्याचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी, ग्रामीण भागातील समुदाय तसेच वेगाने विकसित होणाऱ्या शहरांना लाभ मिळेल, असा विश्वास मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
या सामंजस्य करारावर राज्य शासनाच्या वतीने सचिव डॉ. राजेश गवांदे, डीबीएस बँक इंडिया लिमिटेडच्या वतीने कार्यकारी संचालक राजीव बग्गा आणि आयआयकेअर फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल भापकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी डीबीएस बँक, आयआयकेअर फाउंडेशनचे प्रतिनिधी तसेच राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.