दोडामार्ग तालुक्यातील कोलझर येथील उपआरोग्य केंद्रातील बांधकाम कोसळल्याने पाण्याच्या दोन्ही टाक्या फुटून पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रकारामुळे उपआरोग्य केंद्रातील मूलभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या समस्येकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय देसाई यांनी प्रशासनाकडे पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी केली होती.
भाजपा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, युवा मोर्चा सरचिटणीस अंकुश उर्फ भैया नाईक आणि माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेत सोमवारी पाहणी केली. यावेळी उपआरोग्य केंद्रातील पाण्याच्या टाक्या फुटल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेण्यात आली.उपआरोग्य केंद्रातील पाणीपुरवठ्याची समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी नवीन पाण्याच्या टाक्या बसविण्यात येणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस यांनी बोलताना दिली. १३ ऑक्टोबर रोजी नवीन पाण्याच्या टाक्या बसवून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.उपआरोग्य केंद्रासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे या समस्येची तातडीने दखल घेऊन नवीन टाक्या बसविण्याबाबत दिलेल्या आश्वासनामुळे स्थानिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.आता १३ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्षात नवीन पाण्याच्या टाक्या बसवून पाणीपुरवठा सुरळीत होतो का, याकडे कोलझरवासीयांचे लक्ष लागले आहे. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित विभागाने बांधकामाची गुणवत्ता आणि सुरक्षिततेची योग्य तपासणी करणेही आवश्यक आहे.