जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!
“

रात्रीच्या अंधारात तासभर थरारक पाठलाग; मत्स्यव्यवसाय विभागाची धाडसी कारवाई, तांडेलसह सात खलाशी ताब्यात

देवगड प्रतिनिधी✍️ : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने आणखी एक कठोर कारवाई केली आहे. कर्नाटकातील मलप्पे बंदराची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ (SHRI ANAGHA) देवगडसमोरील समुद्रात पकडून जप्त करण्यात आली. देवगडचे अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या बेकायदा मासेमारीविरोधातील ‘नो टॉलरन्स’ धोरणानुसार रात्रीच्या अंधारात ही मोहीम राबविण्यात आली.




२३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १२.२५ वाजण्याच्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाची देवगडसमोरील समुद्रात गस्त सुरू होती. यावेळी किनाऱ्यापासून सुमारे ५ ते ६ नॉटिकल मैल अंतरावर ‘श्री अनघा’ ही नौका वैध परवान्याशिवाय ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आले. गस्तीवरील ‘शीतल’ नौका दिसताच संबंधित ट्रॉलरने वेग वाढवून अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला.




पाठलाग सुरू असताना ट्रॉलरवरील कर्मचाऱ्यांनी गस्ती नौकेच्या दिशेने दोरखंड आणि जाळे फेकले. त्यामुळे गस्ती नौकेच्या प्रोपेलरमध्ये जाळे अडकून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही किरण वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सागरी सुरक्षा रक्षकांनी संयम आणि प्रसंगावधान राखत पाठलाग सुरू ठेवला. अंधार, समुद्रातील परिस्थिती आणि तुलनेने अधिक वेगवान हायस्पीड ट्रॉलर अशा आव्हानांवर मात करत पथकाने तांत्रिक कौशल्याच्या जोरावर नौकेचा पाठलाग केला.




सुमारे तासभर चाललेल्या थरारक पाठलागानंतर अखेर ‘श्री अनघा’ ही नौका देवगडसमोरील समुद्रात ताब्यात घेण्यात आली. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ आणि सुधारित अधिनियम २०२१ अंतर्गत नौका जप्त करण्यात आली. या नौकेवर तांडेलसह एकूण सात खलाशी होते. त्यांच्याविरोधातील कायदेशीर प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या संपूर्ण कारवाईचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.




जप्त करण्यात आलेल्या नौकेचा तपशील




- नौकेचे नाव : श्री अनघा (SHRI ANAGHA)

- नोंदणी क्रमांक : IND-KA-02-MM-5927

- मालक : मिथुन सुवर्णा

- पत्ता : कालमाडी बोट्टला, मल्पी, कोडावूर, उडपी




मलप्पे बंदरातील या नौका अधिक अश्वशक्ती क्षमतेच्या असल्याचे समजते. मालवण आणि देवगड परिसरातील स्थानिक मच्छिमारांनी हायस्पीड ट्रॉलरमुळे त्यांच्या मासेमारीच्या जाळ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात बेकायदा मासेमारी करणाऱ्या परराज्यातील नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे.




ही मोहीम देवगडचे अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ‘शीतल’ गस्ती नौकेच्या माध्यमातून पार पडली. सागरी सुरक्षा रक्षक संतोष टुकरुल, धाकोजी खवले, अल्पेश नेसवनकर, योगेश फाटक, अमित बांधकर आणि स्वप्नील सावजी यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण योगदान दिले. सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई करण्यात आली.




कारवाईबाबत बोलताना किरण वाघमारे म्हणाले की, स्थानिक मच्छिमारांच्या हिताचे रक्षण करणे आणि सागरी जैवविविधतेचे संवर्धन करणे हे विभागाचे प्राथमिक कर्तव्य आहे. बेकायदा मासेमारी करणाऱ्या कोणत्याही नौकेला सोडले जाणार नाही. रात्रीच्या अंधारातही पथकाने आपले कर्तव्य बजावले असून, मंत्री नितेश राणे यांच्या कठोर धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. यापुढेही अशा कारवाया सुरू राहतील. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांना निर्धास्तपणे मासेमारी करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




रात्रीच्या अंधारात भर समुद्रात अधिक वेगवान नौकेचा तासभर पाठलाग करून तिला पकडणे हे मोठे आव्हान होते. मात्र, योग्य नियोजन, प्रसंगावधान, तांत्रिक कौशल्य आणि कर्तव्यनिष्ठेच्या जोरावर मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. या कारवाईमुळे स्थानिक मच्छिमारांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्यासोबतच सागरी क्षेत्रातील बेकायदा मासेमारीला आळा घालण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. बेकायदा मासेमारीविरोधात ‘नो टॉलरन्स’ धोरण यापुढेही कायम राहणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
सामाजिक

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!
आंतरराष्ट्रीय

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती
प्रशासन

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!
शैक्षणिक

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!

ANCHOR AD SLOT