दोडामार्ग प्रतिनिधी✍️ : युवा पिढीला व्यसनांच्या विळख्यापासून दूर ठेवून त्यांच्यामध्ये निरोगी जीवनशैली आणि सकारात्मक विचारांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने दोडामार्ग येथे ‘नशामुक्त युवा’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग, मेरा युवा भारत आणि दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत दोडामार्ग ज्युनिअर कॉलेज येथे हा कार्यक्रम होणार आहे.
सध्याच्या काळात समाजामध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असून, ही चिंतेची बाब बनली आहे. विशेषतः तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊ नये, यासाठी त्यांना व्यसनांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगणे आवश्यक आहे. युवकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून व्यसनमुक्त जीवनाचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
युवा पिढी ही देशाच्या विकासाची महत्त्वपूर्ण शक्ती आहे. या शक्तीचा उपयोग व्यसनांमध्ये न गुंतता विधायक कार्यासाठी व्हावा आणि त्यातून निरोगी, सक्षम व व्यसनमुक्त समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांची आवश्यकता आहे.
या कार्यक्रमाला शिक्षणप्रेमी, समाजसुधारक, माजी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. व्यसनमुक्त समाजनिर्मितीच्या या चळवळीत सहभागी होऊन उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.