जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

पात्र मतदार वगळला जाणार नाही, याची खबरदारी घ्या

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पात्र मतदार वगळला जाणार नाही, याची खबरदारी घ्या
“

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे निर्देश; गैरहजर व स्थलांतरित मतदारांच्या नोंदींची सखोल पडताळणी करण्याच्या सूचना

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️: सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादीशी संबंधित ९९.३६ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम तातडीने पूर्ण करून निर्धारित वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच गैरहजर आणि कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांच्या याद्यांची बूथस्तरीय अधिकारी (BLO) व बूथस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांच्या माध्यमातून सखोल पडताळणी करावी. कोणत्याही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.




जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित SIR आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मतदार यादी पुनरीक्षणाची सद्यस्थिती, डिजिटायझेशनचे काम, दावे व हरकती, नोटीस व सुनावणी प्रक्रिया तसेच नवमतदार नोंदणीचा सविस्तर आढावा घेतला.




भारतीय नागरिकत्वाची अट पूर्ण करणाऱ्या आणि १८ वर्षे वय पूर्ण झालेल्या प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार म्हणून नोंद होणे आवश्यक असल्याचे चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले.




बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांचे स्वागत केले. त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामाची माहिती दिली.




बैठकीला अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी निवडणूक बालाजी शेवाळे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.




३ हजार ७५ प्रकरणे अद्याप प्रलंबित




कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघांतील ३१ ऑगस्ट २०२६ रोजीच्या प्रारूप मतदार यादीत एकूण ६ लाख ५ हजार ५०१ मतदारांचा समावेश आहे. यापैकी ५ लाख ६१ हजार ३१० मतदारांच्या नोंदी अंतिम प्रसिद्धीसाठी पात्र ठरल्या आहेत. दावे व हरकतींशी संबंधित ३ हजार ७५ मतदारांची प्रकरणे अद्याप प्रलंबित असून, त्यावर तातडीने कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना चोक्कलिंगम यांनी दिल्या.




मतदारसंघनिहाय कामाचा विचार करता कणकवली विधानसभा मतदारसंघात ९९.९८ टक्के, कुडाळमध्ये ९८.७२ टक्के, तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ९९.३३ टक्के काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील नोटीस व सुनावणी प्रक्रियेची एकूण प्रगती ९९.३६ टक्के असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.




८२ हजार ५१७ गणना अर्ज संकलित नाहीत




जिल्ह्यातील ६ लाख ८८ हजार १४ विद्यमान मतदारांच्या तुलनेत प्रारूप मतदार यादीमध्ये ६ लाख ५ हजार ५०१ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. गणना अर्जांपैकी विविध कारणांमुळे ८२ हजार ५१७ अर्ज संकलित करता आलेले नाहीत. यामध्ये ३६ हजार ६०१ मृत मतदार, ४ हजार ३६५ अनुपस्थित अथवा शोधता न आलेले मतदार, ३३ हजार ७६६ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार आणि ७ हजार ६६७ अन्यत्र यापूर्वीच नोंदणी झालेल्या मतदारांचा समावेश आहे.




या सर्व नोंदींची BLO आणि BLA यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष व सखोल पडताळणी करण्याच्या सूचनाही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिल्या. विशेषतः नमुना ७ अंतर्गत नाव वगळण्याच्या प्रकरणांमध्ये आवश्यक ती प्रत्यक्ष खातरजमा करावी आणि कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही, याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.




नमुना ६, ७ व ८ अर्जांवरही चर्चा




मतदार नोंदणी, मतदाराचे नाव वगळणे तसेच मतदार यादीतील तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नमुना ६, ७ आणि ८ अर्जांबाबतही बैठकीत चर्चा झाली. या तीन प्रकारचे एकूण १० हजार २९२ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ८ हजार ५५३ अर्जांवर कार्यवाही सुरू आहे.




अर्ज भरण्यास नागरिकांकडून अनुत्सुकता दिसून आल्यास किंवा प्रक्रियेत काही अडचणी येत असल्यास BLO आणि BLA यांनी संबंधित नागरिकांना आवश्यक सहकार्य करावे. नियमित मतदार नोंदणीच्या प्रक्रियेलाही अधिक गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. या प्रक्रियेत मागे राहिलेल्या पात्र नागरिकांना मतदार म्हणून नोंदणीची संधी उपलब्ध होईल, असे चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले.




SIR प्रक्रियेत पारदर्शकतेवर भर




यापूर्वी राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत SIR प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखण्याची मागणी करण्यात आली. कोणती नावे वगळण्यात आली, कोणत्या नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि संबंधित अर्जांवर कोणती कार्यवाही करण्यात आली, याची माहिती सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध करून देण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. त्यानुसार प्रक्रियेशी संबंधित माहिती सार्वजनिक करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले.




१६ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी




दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोबर रोजी संपली आहे. आता नोटीस व सुनावणी प्रक्रियेसाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यापूर्वी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करून पात्र मतदारांच्या नोंदी अचूक आणि अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या.




नवीन EVM गोडाऊनची पाहणी




दरम्यान, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सिंधुदुर्गनगरी येथील नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) गोडाऊनची पाहणी केली. मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट सुरक्षित ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची त्यांनी पाहणी करून आढावा घेतला. गोडाऊनमधील सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन यंत्रणा, द्विस्तरीय सुरक्षा व्यवस्था तसेच अन्य आवश्यक भौतिक आणि तांत्रिक सुविधांची तपासणी करण्यात आली.




नवीन गोडाऊनची उभारणी व व्यवस्थापन करताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि निर्धारित नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मतदार यादीचे पुनरीक्षण तसेच मतदान यंत्रांची सुरक्षितता या दोन्ही बाबींमध्ये नियमांचे पालन, पारदर्शकता आणि अचूकतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT