मुंबई प्रतिनिधी ✍️: राज्यात घरगुती पाइपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) जोडण्यांचे काम अधिक वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी गॅस कंपन्यांना देण्यात आलेल्या विविध सवलतींची मुदत राज्य सरकारने ३१ मार्च २०२७ पर्यंत वाढवली आहे. यामध्ये परवानग्या २४ तासांत देणे, काही शुल्कांमध्ये सूट तसेच दिवसरात्र काम करण्याची परवानगी यांसारख्या सवलतींचा समावेश आहे.
राज्यात स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसचा सुलभ पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पाइपद्वारे नैसर्गिक वायू वितरण व्यवस्थेला चालना देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार तसेच केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार राज्यातील सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD) नेटवर्कचा विस्तार जलदगतीने करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
PNG जोडण्यांच्या विस्तारासाठी राज्य सरकारने ‘ईज ऑफ डुइंग’ अंतर्गत परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. काही आवश्यक परवान्यांचे शुल्क माफ करण्यासोबतच गॅस कंपन्यांना विविध सवलती देण्यात आल्या आहेत. या सवलतींची मुदत यापूर्वी ३० जून २०२६ पर्यंत होती. आता त्यामध्ये वाढ करून त्या ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू ठेवण्यात आल्या आहेत.
यासंदर्भातील शासन निर्णय नगरविकास विभागाने जारी केला आहे. राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांना PNG जोडण्यांच्या कामाला गती देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जागतिक भू-राजकीय परिस्थितीमुळे ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम होत असून एलपीजीच्या उपलब्धतेवरही मर्यादा निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात पाइपद्वारे नैसर्गिक वायूच्या जोडण्यांचा विस्तार अधिक वेगाने करण्यावर शासनाने भर दिला आहे. त्यामुळे घरगुती वापरासाठी PNG उपलब्धतेचे जाळे व्यापक होण्यास मदत होणार आहे.