सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️ : इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील धनगर समाजाच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.
या योजनेंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील (NT-C) बारावीनंतर पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यमान विद्यार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ऑनलाईन पोर्टल सुरळीत होईपर्यंत विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यानुसार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे जमा करावेत.
जिल्ह्यातील संबंधित पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता विहित कालावधीत अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.