वेंगुर्ला प्रतिनिधी✍️: गावातील भूजल पातळीत वाढ करून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने पेंडूर ग्रामपंचायतीने जलसंधारणाच्या कामांना सुरुवात केली आहे. विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियानांतर्गत ग्रामपंचायत पेंडूर येथे शोषखड्डे आणि जलतारा कामांचा शुभारंभ शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात करण्यात आला.
पंचायत समिती वेंगुर्लाचे सभापती शंकर घारे यांच्या हस्ते या कामांचे उद्घाटन झाले. यावेळी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमाला पेंडूरचे सरपंच संतोष दशरथ गावडे, उपसरपंच मिलिंद गावडे, सदस्य महादेव नाईक, ग्रामपंचायत अधिकारी सोमा राऊळ, पंचायत समितीचे तांत्रिक सहाय्यक विवेक शिरसाट, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विवेक तिरोडकर, पाल सोसायटीचे चेअरमन कमलेश गावडे आणि लाभार्थी तानाजी नाईक उपस्थित होते.
याशिवाय ग्रामपंचायत कर्मचारी वैशाली नाईक, घनश्याम नाईक, अंकुश गावडे तसेच ग्रामस्थ आणि लाभार्थी संतोष नाईक, अंकुश नाईक, तनुजा नाईक व विलास शेट्ये यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यावर भर
पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत जिरविणे, भूजल पातळी वाढविणे आणि उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. शोषखड्डे आणि जलतारा यांसारख्या कामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होणार असून, त्यातून भूजल पुनर्भरणाला चालना मिळेल. परिणामी भविष्यात गावातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी या उपाययोजना उपयुक्त ठरणार आहेत.
जलसंवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक ग्रामस्थाने त्यात योगदान देणे आवश्यक आहे, या भूमिकेतून ग्रामपंचायत पेंडूरने हा उपक्रम हाती घेतला आहे. गावाचा शाश्वत विकास साधताना नैसर्गिक जलस्रोतांचे जतन करणे आणि भविष्यातील पाणीसमस्या टाळण्यासाठी अशा जलसंधारणाच्या कामांची प्रभावी अंमलबजावणी प्रत्येक गावात होणे गरजेचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
पेंडूर ग्रामपंचायतीच्या या जलसंवर्धन उपक्रमाचे उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांनी कौतुक केले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा आणि जलसमृद्ध गाव घडवा’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.