सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️ : भूजल पातळीत वाढ व्हावी, पाणीटंचाईवर मात करता यावी आणि जलसंधारणाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सिंधुदुर्ग कार्यालयाच्या पुढाकारातून कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी ढोलकरवाडी परिसरातील ओढ्यावर श्रमदानातून हा बंधारा बांधण्यात आला. या उपक्रमात शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी तसेच मुंबई येथील सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाच्या भूशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या श्रमदान उपक्रमात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक राहुल खंदारे, सहाय्यक भूवैज्ञानिक शिवलिंग चव्हाण, कनिष्ठ भूवैज्ञानिक चेतन रुपवते व शहाजी माडभगत, यांत्रिकी विभागाचे शाखा अभियंता मजहर शेख यांच्यासह कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी योगदान दिले. माणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच मनीषा भोसले, ग्रामपंचायत अधिकारी चेतना म्हाडगूत, लिपिक विलास भोई आणि अन्य कर्मचाऱ्यांनीही बंधारा उभारणीसाठी सहकार्य केले.
सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाचे भूशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. अश्विन पुंडलिक, डॉ. श्वेता पाटील आणि विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष श्रमदान करत जलसंवर्धनाच्या कार्यात सहभाग नोंदविला. यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक राहुल खंदारे यांनी विद्यार्थ्यांना वनराई बंधाऱ्यांचे महत्त्व समजावून सांगितले. पावसाचे पाणी अडवून त्याचा भूजल पुनर्भरणासाठी उपयोग करणे, तसेच अशा जलसंधारणाच्या उपाययोजनांद्वारे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यास कशी मदत होते, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्याची भूशास्त्रीय रचना आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या भूजल सर्वेक्षण, संवर्धन आणि विकासविषयक उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
वनराई बंधारा उभारणीच्या उपक्रमानंतर महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी ओरोस येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेला भेट दिली. यावेळी प्रयोगशाळेतील रसायनी पूजा दिवाडकर आणि अनुजैविक तज्ज्ञ समाधान ताटे यांनी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचे महत्त्व पटवून दिले. तसेच प्रयोगशाळेत पाण्याच्या नमुन्यांची तपासणी कशा पद्धतीने केली जाते, पाण्यातील विविध रासायनिक व अनुजैविक घटकांचे परीक्षण कसे केले जाते, याची सविस्तर माहिती दिली.
या उपक्रमातून प्रत्यक्ष श्रमदानासोबतच विद्यार्थ्यांना जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि पाणी गुणवत्ता तपासणी याविषयी प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती मिळाली.