ठाणे प्रतिनिधी✍️ : देशात जाणीवपूर्वक अराजकतेचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आणि जनतेची दिशाभूल करणारे राजकारण सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या वतीने ‘लोकतंत्र बचाव पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री प्रताप सरनाईक, गणेश नाईक, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्यासह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील खासदार, आमदार, महापौर तसेच तिन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लोकशाही व्यवस्थेत जनतेचा कौल सर्वोच्च असतो. निवडणुकीत जनतेने दिलेला निर्णय स्वीकारणे आणि विरोधी पक्षात बसण्याची वेळ आल्यास ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे, हे लोकशाहीचे महत्त्वाचे तत्त्व आहे. मात्र, निवडणुकीतील पराभव स्वीकारण्याऐवजी जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आणि देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पदयात्रेच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेवरही महायुतीच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक चुकीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. लोकशाहीच्या नावाखाली देशाच्या प्रगतीत अडथळे निर्माण करणारे राजकारण थांबले पाहिजे, अशी भूमिका पदयात्रेत सहभागी नेत्यांनी मांडली.
देशाला अराजकतेऐवजी विकासाची, नकारात्मक राजकारणाऐवजी जनहिताला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे, असा संदेश यावेळी वक्त्यांनी आपल्या भाषणातून दिला. लोकशाहीचा खरा अर्थ जनतेचा निर्णय मान्य करण्यात असून, देशाच्या विकासाला विरोध करण्यात नाही, अशी भूमिका महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केली.
या पदयात्रेच्या माध्यमातून महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी एकत्रित सहभाग नोंदवत लोकशाहीच्या रक्षणाचा आणि विकासाभिमुख राजकारणाचा निर्धार व्यक्त केला.