वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : खानोली येथील सिद्धेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या भव्य नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त मनिष दळवी मित्रमंडळाच्या वतीने शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता भव्य तिरंगी डबलबारी भजनाच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या तिरंगी डबलबारी सामन्यात नामवंत भजनबुवांचा सहभाग असणार आहे. यामध्ये बुवा संदिप लोके आणि विजय परब यांच्या नेतृत्वाखालील वडची देवी भजन मंडळ, लिंगडाळ (देवगड), बुवा विजय ऊर्फ गुंडू सावंत यांच्या नेतृत्वाखालील श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, वर्दे आणि बुवा संदिप पुजारे यांच्या नेतृत्वाखालील श्री महादेवेश्वर प्रासादिक भजनी मंडळ, नाडण यांच्यात भजनाचा रंगतदार सामना रंगणार आहे.
या भजन मंडळांना पखवाजावर योगेश सामंत, विराज बावकर आणि संकेत राऊळ, तर तबल्यावर संदेश सुतार, भावेश परब आणि कौस्तुभ घाडी यांची साथ लाभणार आहे.
भक्तिमय वातावरणात रंगणाऱ्या या तिरंगी डबलबारी भजनाच्या सामन्याचा लाभ भजनप्रेमी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन मनिष दळवी मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.