सावंतवाडी प्रतिनिधी ✍️: तालुक्यातील कोंडुरे येथे शनिवारी (२४ ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास अंदाजे १२ वर्षांचा गवा मृतावस्थेत आढळून आला. गवा मृत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.
वनपाल विजय दाते, वनरक्षक प्रकाश रानगिरे तसेच रेस्क्यू टीमचे बबन रेडकर, शुभम फाटक, देवेंद्र परब आणि नितीन सावंत यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. प्राथमिक माहितीनुसार हा गवा मागील सात ते आठ दिवसांपासून एकाच ठिकाणी असल्याचे समोर आले. त्याच्या पायांना जंतू पडल्याने तो हालचाल करू शकत नसल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनाद बाळगी यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृत गव्याचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर वनविभागाच्या उपस्थितीत नियमानुसार गव्याला दफन करण्यात आले. यावेळी मृत गव्याचा पंचनामा करण्यात आला.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक निरीक्षणानुसार गव्याचा मृत्यू संसर्गजन्य आजारामुळे झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, मृत्यूचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, त्यासाठी पुढील तपासणी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
या संपूर्ण कार्यवाहीत कोंडुरे परिसरातील ग्रामस्थांनी वनविभागाला सहकार्य केले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांच्या आरोग्याबाबत तसेच त्यांच्या हालचालींबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. आजारी, जखमी किंवा अस्वस्थ अवस्थेत वन्यप्राणी आढळल्यास त्याची माहिती तातडीने वनविभागाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.