कुडाळ प्रतिनिधी✍️: गणेशोत्सव आणि विजयादशमीचा सण संपला असून दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. मात्र, ओरोस येथील शासकीय मेडिकल कॉलेजमधील सुमारे साडेचारशे कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी दिला आहे. कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचा मुद्दा उपस्थित करताना पावसकर म्हणाले की, गेल्या चार दिवसांपासून मेडिकल कॉलेजमधील कर्मचाऱ्यांचे आपल्याला फोन येत आहेत. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांचे वेतन अद्याप मिळालेले नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. मेडिकल कॉलेजचे डीन अमोल शिंदे यांनीही ही बाब मान्य केली आहे.
दिवाळी सण तोंडावर असताना चारशे ते साडेचारशे कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतन थकीत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, संबंधित ठेकेदार अभिजित भोसले यांनीही आपला फोन बंद करून ठेवल्याचे पावसकर यांनी सांगितले.
या प्रकरणी डीन अमोल शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांनी आज दुपारपर्यंत वेतनाबाबत निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तातडीने मिळावे आणि त्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी प्रशासनाने तत्काळ निर्णय घ्यावा. अन्यथा संबंधित कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रुपेश पावसकर यांनी दिला.