वेंगुर्ला प्रतिनिधी : वेंगुर्ला शहरातील भटवाडी परिसरात घोरपडीचे एक पिल्लू आढळल्याने परिसरात उत्सुकता निर्माण झाली. यावेळी ज्योती प्रसन्ना देसाई यांनी प्रसंगावधान राखत पिल्लाला सुरक्षितपणे पकडून ठेवले. त्यानंतर तातडीने वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे घोरपडीच्या पिल्लाला सुरक्षितपणे वनविभागाच्या ताब्यात देणे शक्य झाले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या जलद बचाव पथकाचे धनंजय मेस्त्री आणि वनसेवक पाडावे यांनी घटनास्थळी पुढील कार्यवाही केली. त्यांनी घोरपडीच्या पिल्लाचा ताबा घेतला असून त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी वनविभागाने स्वीकारली आहे.
अनेकदा वन्यप्राणी मानवी वस्तीत आढळल्यास नागरिकांमध्ये घबराट निर्माण होते. मात्र, अशा प्रसंगी घाईगडबड किंवा भीतीपोटी वन्यजीवांना इजा होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असते. ज्योती प्रसन्ना देसाई यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे या पिल्लाला सुरक्षितपणे वनविभागापर्यंत पोहोचविणे शक्य झाले.
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी दाखविलेल्या सहकार्याबद्दल वनविभागाने ज्योती प्रसन्ना देसाई यांचे विशेष आभार मानले. वन्यजीव हे निसर्गाच्या परिसंस्थेतील महत्त्वाचे घटक असून त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे लोकवस्तीमध्ये कोणताही वन्यप्राणी आढळल्यास त्याला त्रास न देता स्वतः हाताळण्याचा धोका टाळावा आणि तातडीने वनविभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.