कणकवली प्रतिनिधी✍️ : महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलच्या ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरतर्फे आयोजित ‘वर्ल्ड फार्मासिस्ट डे २०२६’ सेलिब्रेशनमध्ये युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल (ता. कणकवली) या महाविद्यालयाने दुहेरी यश मिळवत आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. या राज्यस्तरीय उपक्रमात महाविद्यालयाने मुंबई झोनमधून इन्स्टिट्यूट कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच महाविद्यालयाचा विद्यार्थी विघ्नेश सुरेश घाडी याने रील स्पर्धेत मुंबई झोनमधून प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलच्या या उपक्रमात महाविद्यालयाने संस्थात्मक गटासह विद्यार्थी गटातही अव्वल स्थान मिळविल्याने या दुहेरी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या स्पर्धेसाठी इव्हेंट कोऑर्डिनेटर म्हणून प्रा. निशा करंदीकर, प्रा. स्वप्नाली पाटील आणि प्रा. स्नेहल मुळये यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे महाविद्यालयाला हे यश संपादन करता आले.
महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल युवक कल्याण संघाचे अध्यक्ष वैभव नाईक, उपाध्यक्षा सौ. स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे, व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. मंदार सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जगताप, उपप्राचार्य डॉ. अमोल उबाळे आणि विभागप्रमुख प्रा. अमर कुलकर्णी यांनी विजेता विद्यार्थी विघ्नेश घाडी याच्यासह मार्गदर्शक प्राध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या दुहेरी यशामुळे विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल या महाविद्यालयाने कणकवलीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उंचावले असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळालेल्या या यशाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.