सावंतवाडी प्रतिनिधी✍️:सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण घटल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर तिलारी प्रकल्पाच्या कालव्याच्या नूतनीकरण व देखभाल-दुरुस्तीसाठी ऑक्टोबर २०२६ ते मे २०२७ या कालावधीत कालव्याचे पाणी बंद करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविला आहे. कालव्याचे पाणी बंद न करता नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्पाच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे.
यंदा एल निनोच्या प्रभावामुळे राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. विशेषतः सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेती व बागायतीवर परिणाम झाला आहे. त्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
तिलारी प्रकल्पाचे कालवे ज्या गावांमधून जातात, त्या परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत कालव्यातील पाणी जमिनीत मुरल्यामुळे वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे कालव्याचे पाणी बंद केल्यास विलवडे, वाफोली, बांदा, इन्सुली तसेच परिसरातील अन्य गावांमधील विहिरींची पाणीपातळी घटण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर होऊ शकतो, असे मनसेने निवेदनात नमूद केले आहे.
एका बाजूला संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन गावोगावी वनराई बंधारे बांधण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला कालव्याचे पाणी बंद करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे कालवा नूतनीकरण व दुरुस्तीची कामे सध्याच्या परिस्थितीत पुढे ढकलावीत आणि कालव्यातून पाणीपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी मनसेने केली आहे.
स्थानिक जनतेच्या पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष करून कालव्याची कामे सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कामे बंद पाडेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तिलारी कालव्याच्या पाणीपुरवठ्याबाबत जलसंपदा विभाग काय निर्णय घेतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.