जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

दुष्काळ निवारणासह जनगणना, एसआयआरची कामे प्राधान्याने पूर्ण करा!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

दुष्काळ निवारणासह जनगणना, एसआयआरची कामे प्राधान्याने पूर्ण करा!
“

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे महसूल अधिकाऱ्यांना निर्देश; महसूल वसुली वाढविण्यासह शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा

सिंधुदुर्ग प्रतिनिधी✍️ : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच जनगणना आणि मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमातील कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. या दोन्ही महत्त्वाच्या कामांना महसूल विभागाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे. तसेच मागील वर्षाच्या तुलनेत यंदा महसूल वसुलीत अधिक वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.




जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरंगी सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित महसूल अधिकारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत महसूल विभागाच्या विविध कामकाजासह शासकीय योजनांची अंमलबजावणी, प्रलंबित प्रकरणे आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रशासकीय विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.




जनगणना आणि एसआयआर कार्यक्रमाचा अंतिम टप्पा सुरू असल्याने सर्व महसूल अधिकाऱ्यांनी या कामांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. गौण खनिजासह महसुलाच्या सर्व स्रोतांमधून अपेक्षित वसुली करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. पुढील आढावा बैठकीपूर्वी महसूल वसुलीच्या आकडेवारीत ठोस वाढ दिसून आली पाहिजे. तसेच महाखनिज २.० प्रणालीच्या कामकाजालाही प्राधान्य द्यावे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.




पुरवठा विभागांतर्गत प्रलंबित असलेली ई-केवायसी आणि आधार सीडिंगची कामे तातडीने पूर्ण करावीत. प्रत्येक तालुक्यात रास्त भाव दुकाने, धान्य गोदामे, पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सी यांच्या तपासण्यांचे प्रमाण वाढवून नियमित तपासणी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.




दुष्काळ निवारणासाठी रोजगार हमीची कामे वाढवा




सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यासाठी दुष्काळ आणि संभाव्य पाणीटंचाई हा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाई टाळण्यासाठी आतापासूनच आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक कामे हाती घ्यावीत. जलस्रोतांचे बळकटीकरण, शोषखड्डे आणि जलतारा उभारण्याच्या कामांना गती द्यावी. या कामांसाठी संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.




सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने पर्यटनस्थळे, निवास व्यवस्था आणि पर्यटनाशी संबंधित अन्य ठिकाणी पाणी बचतीबाबत जनजागृती करावी. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवून पर्यटकांनाही पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करावे. त्याचबरोबर सीआरझेडशी संबंधित प्रकरणे आणि कामांबाबतही प्राधान्याने कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.




महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत (आरटीएस) नागरिकांना अधिसूचित सेवा निर्धारित कालमर्यादेत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या अर्जांवर विनाकारण विलंब होणार नाही, याची सर्व अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे, न्यायालयीन कामकाज, शासकीय जमिनी, अतिक्रमणे तसेच तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयांच्या कामकाजावर नियमित लक्ष ठेवून आवश्यक कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.




या बैठकीत महसूल व गौण खनिज वसुली, ई-फेरफार, लोकसेवा हक्क अधिनियम, बळीराजा पाणंद रस्ते, सामाजिक सुरक्षा योजनांची अंमलबजावणी, शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे, भोगवटदार वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतर, न्यायालयीन प्रकरणे आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना अशा विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.




पुढील महसूल अधिकारी आढावा बैठकीपूर्वी सर्व विभागांनी प्रलंबित कामे कमी करून महसूल वसुली, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांमध्ये ठोस प्रगती साधावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.




या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी शारदा पवार, प्रतिभा वराळे, नितीन राऊत, बालाजी शेवाळे, आरती देसाई यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सावंतवाडीतील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार
राजकीय

सावंतवाडीतील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

सिंधुदुर्गात सायन्स रिसर्च सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आमदार निलेश राणे
सामाजिक

सिंधुदुर्गात सायन्स रिसर्च सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नशील : आमदार निलेश राणे

प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड!
प्रशासन

प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड!

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी विशाल परब नतमस्तक
सांस्कृतिक

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी विशाल परब नतमस्तक

ANCHOR AD SLOT