कणकवली प्रतिनिधी✍️ : कणकवली शहराच्या पर्यटनाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणारा पर्यटन महोत्सव ७, ८, ९ आणि १० जानेवारी रोजी रंगणार आहे. हा महोत्सव अधिक आकर्षक, भव्य आणि लोकसहभागातून यशस्वी करण्यासाठी नुकतीच आढावा बैठक पार पडली. नगराध्यक्ष संदेश पारकर आणि उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महोत्सवाच्या नियोजनाबाबत विविध कल्पना आणि सूचना मांडण्यात आल्या. विशेषतः महोत्सवात स्थानिक कलाकारांना अधिकाधिक संधी देण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
कणकवली पर्यटन महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता शहराची कला, संस्कृती, परंपरा आणि पर्यटनवैशिष्ट्ये अधोरेखित करणारा ठरावा, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. कार्यक्रमांचे योग्य वेळापत्रक, नियोजनबद्ध आयोजन आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यावर विशेष भर देण्याचे ठरविण्यात आले.
महोत्सवाच्या निमित्ताने शहरात आकर्षक सेल्फी पॉईंट उभारणे, विविध माध्यमांतून महोत्सवाची प्रसिद्धी करणे तसेच नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या. कणकवलीच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी ‘कणकवली भूषण’ पुरस्कार सुरू करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
स्थानिक महिला बचत गट आणि उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांच्या उत्पादनांसाठी स्वतंत्र स्टॉल उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली. कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृती, हस्तकला, स्थानिक उत्पादने आणि उद्योगांचे दर्शन घडविणारे ‘कोकण प्रेम प्रदर्शन’ आयोजित करण्याची संकल्पनाही पुढे आली. यामुळे स्थानिक व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांच्या प्रचारासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होऊ शकते.
नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्थानिक कलाकारांचा सहभाग वाढविण्यावर बैठकीत एकमताने भर देण्यात आला. कणकवलीच्या जुन्या सांस्कृतिक परंपरा, पूर्वीच्या महोत्सवांतील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आणि शहराच्या ऐतिहासिक आठवणींनाही यंदाच्या महोत्सवात स्थान देण्याची सूचना करण्यात आली. त्याचबरोबर भविष्यातील कणकवलीचे चित्र उभे करणारे विशेष उपक्रम राबविण्याबाबतही विचारविनिमय झाला.
शहरातील प्रत्येक प्रभागाला महोत्सवाशी जोडण्यासाठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची सूचना करण्यात आली. महिलांसाठी विशेष पैठणी कार्यक्रम, आकर्षक चित्ररथ आणि देखावे यांचाही महोत्सवात समावेश करण्याची मागणी करण्यात आली. संपूर्ण शहराचा सहभाग असलेला हा महोत्सव नागरिकांसाठी आनंदोत्सव ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या बैठकीला नगरसेवक रुपेश नार्वेकर, बाळू पारकर, संकेत नाईक, जाई मूरकर, जय धुमाळे, नीलम पालव, संजय मालंडकर, अभय खडपकर, धीरज काणेकर, हरिभाऊ भिसे, संजय राणे, संदीप पेंढुरकर, महेश कोदे, महेश कारेकर, दिव्या साळगावकर, न्हानू देसाई, शितल मांजरेकर, किशोर कदम, रीना जोगळे, सौरभ पारकर, एस. एल. सपकाळ, अमित मयेकर, मनोज तोरसकर, रामदास मांजरेकर, चाणी जाधव, सोहम वाळके, तेजस राणे, निकित मुरकर, श्रीपाद पाचंगे, दादा कोरडे, शेखर गवस तसेच प्रशासकीय अधिकारी अमोल अगम आदी उपस्थित होते.
शहरातील सर्व घटकांना सोबत घेऊन पर्यटन महोत्सवाचे नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. स्थानिक कला, संस्कृती, पर्यटन आणि व्यावसायिकांना चालना देणारा हा महोत्सव यंदा कोणते नवे आकर्षण घेऊन येतो, याची उत्सुकता कणकवलीकरांना लागली आहे.