सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️: ग्रामीण तसेच शहरी भागातील दैनंदिन समस्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय सुचविणाऱ्या युवक, विद्यार्थी, प्राध्यापक, स्टार्टअप, बचत गट आणि सामाजिक संस्थांसाठी ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज-२०२६’ ही राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत नोंदणी करता येणार असून, सहभागासाठी वयोमर्यादा किंवा कोणतेही नोंदणी शुल्क ठेवण्यात आलेले नाही, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रियंका कनके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या आजूबाजूच्या दैनंदिन समस्या ओळखून त्यावर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रत्यक्षात अंमलात आणता येतील, असे परिणामकारक आणि नाविन्यपूर्ण उपाय विकसित करणे हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश आहे.
दहा क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण कल्पनांना संधी
स्पर्धेसाठी कृषी, कायदा व सुव्यवस्था, महिला व बालकल्याण, नागरी विकास, आरोग्य, संरक्षण, शाश्वतता व ऊर्जा, पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेसह उदयोन्मुख तंत्रज्ञान तसेच शिक्षण व रोजगारक्षमता अशा दहा प्रमुख क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धकांनी सादर केलेली नाविन्यपूर्ण कल्पना यापैकी कोणत्याही एका क्षेत्राशी संबंधित असणे आवश्यक आहे.
५० विजेत्यांची होणार निवड
या स्पर्धेसाठी एकूण पाच कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक क्षेत्रातून पाच विजेत्यांची निवड केली जाणार असून, दहा क्षेत्रांमधून एकूण ५० विजेते निवडले जातील. यामध्ये एका महिला प्रवर्गातील, एका १८ वर्षांखालील प्रवर्गातील आणि तीन सर्वसाधारण प्रवर्गातील विजेत्यांचा समावेश असेल.
विजेत्यांना १० लाख रुपयांपर्यंत वर्क ऑर्डर, त्यांच्या कल्पनेवर आधारित पायलट प्रकल्प राबविण्याची संधी, शासकीय खरेदी प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी तसेच इनक्युबेशनसाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
असा करा अर्ज
इच्छुक सहभागीांनी https://sevainnovationchallenge.in या अधिकृत संकेतस्थळावर मोबाईल क्रमांक आणि ई-मेलच्या माध्यमातून नोंदणी करून विहित नमुन्यात आपली नाविन्यपूर्ण कल्पना सादर करावी. या स्पर्धेत वैयक्तिक सहभागासोबतच शालेय विद्यार्थी, आयटीआय, पॉलिटेक्निक व पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थी, प्राध्यापक, स्टार्टअप, बचत गट तसेच सामाजिक संस्थांनाही सहभागी होता येणार आहे.
सिंधुदुर्ग हा कृषिप्रधान जिल्हा असल्याने येथील युवकांसमोर कृषी, आरोग्य, महिला सुरक्षा आणि नागरी व्यवस्थापन यांसारख्या विविध क्षेत्रांतील स्थानिक समस्या सोडविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्याची मोठी संधी आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी करून या उपक्रमात सहभाग वाढवावा. महाराष्ट्राला जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात जिल्ह्याने योगदान द्यावे, असे आवाहन सहायक आयुक्त प्रियंका कनके यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी
संकेतस्थळ : https://sevainnovationchallenge.in
संपर्क क्रमांक : ०२३६२-२२८८३५
ई-मेल : sindhudurgrojgar@gmail.com