जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

‘सिंधुदुर्गला पहिला हिंदुत्ववादी जिल्हा बनविण्यासाठी प्रयत्न करणार’ पालकमंत्री नितेश राणे

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

‘सिंधुदुर्गला पहिला हिंदुत्ववादी जिल्हा बनविण्यासाठी प्रयत्न करणार’  पालकमंत्री नितेश राणे
“

‘औरंगजेब आणि उत्तरकालीन मुघल’ पुस्तकाचे कुडाळात प्रकाशन; इतिहासाच्या अभ्यासाची गरज असल्याचे प्रतिपादन

कुडाळ प्रतिनिधी✍️: छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेताना हिंदू धर्म आणि राज्याचे संरक्षण करण्याची गरज आहे. ज्येष्ठ इतिहासकार व संशोधक स्व. गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या ‘औरंगजेब आणि उत्तरकालीन मुघल’ या पुस्तकातून इतिहासातील अनेक पैलू समोर येतात. त्यामुळे प्रत्येकाने या पुस्तकाचा अभ्यास करावा, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. सिंधुदुर्गला राज्यातील पहिला हिंदुत्ववादी जिल्हा बनविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.




शिवशंभू विचारमंच कोकण प्रांत, शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग, स्वराज्य सक्षमीकरण प्रतिष्ठान मालवण, सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, दुर्गवीर मावळा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये स्व. गजानन भास्कर मेहेंदळे लिखित ‘औरंगजेब आणि उत्तरकालीन मुघल’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राणे बोलत होते.




यावेळी शिवशंभू विचारमंचचे राष्ट्रीय संयोजक तथा शिवकालीन इतिहासाचे अभ्यासक सुधीर थोरात, शिवशंभू विचारमंच कोकण प्रांताचे संयोजक भूषण साटम, कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर आणि रमाकांत नाईक उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करून आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.




नितेश राणे यांनी स्व. मेहेंदळे यांच्या इतिहास संशोधनाचा संदर्भ देताना सांगितले की, आपण त्यांच्या लेखनाचे चाहते असून ‘इस्लामाची ओळख’ या पुस्तकातील संदर्भांचा आपल्या भाषणांमध्ये उपयोग करतो. औरंगजेबाच्या राजवटीचे स्वरूप आणि त्या काळातील परिस्थिती समजून घेण्यासाठी इतिहासाचा अभ्यास आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.




छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मविषयक भूमिकेवरही राणे यांनी भाष्य केले. शिवाजी महाराजांची प्रतिमा धर्मनिरपेक्ष स्वरूपात मांडण्याच्या प्रयत्नांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. शिवरायांच्या सैन्यातील मुस्लिम सैनिकांच्या सहभागाबाबत मेहेंदळे यांनी पुराव्यांच्या आधारे मांडणी केली असल्याचा दावा करत या विषयावर इतिहासाच्या आधारावर चर्चा होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.




शिवजयंती उत्सव, गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि धार्मिक स्थळांच्या विषयावरही राणे यांनी भूमिका मांडली. शिवरायांचे गड-किल्ले मंदिरांप्रमाणेच पवित्र असल्याचे सांगत त्यांनी विशाळगडावरील परिस्थितीचा उल्लेख केला. कुडाळ बाजारपेठेत दिसणाऱ्या नव्या चेहऱ्यांबाबत नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.




‘मी शंभर टक्के हिंदू आहे आणि हीच माझी ओळख आहे,’ असे सांगत प्रत्येकाने आपली सांस्कृतिक ओळख जपली पाहिजे, असे राणे म्हणाले. हिंदू सणांच्या काळात केवळ हिंदूंनीच संयम बाळगण्याची अपेक्षा का केली जाते, असा प्रश्न उपस्थित करत सर्वांसाठी समान नियम असावेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.




यावेळी सुधीर थोरात यांनी स्व. गजानन मेहेंदळे यांच्या इतिहास संशोधन कार्याचा आढावा घेत ‘औरंगजेब आणि उत्तरकालीन मुघल’ या पुस्तकाची माहिती दिली. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करताना पुढील पिढीला इस्लामची ओळख व्हावी, या उद्देशाने मेहेंदळे यांनी इस्लामचा अभ्यास सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. औरंगजेबाच्या काळातील जिझिया कर, धर्मांतराचे प्रयत्न आणि तत्कालीन धार्मिक परिस्थितीचा आढावा पुस्तकात घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. मुघलांविरुद्ध मिळविलेल्या राजकीय विजयाचे सांस्कृतिक विजयात रूपांतर करता आले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.




कार्यक्रमाला संध्या तेरसे, सुनील पवार, डॉ. बापू भोगटे, डॉ. सुविनय दामले, अॅड. विवेक मांडकुलकर, मोहन सावंत, मंदार शिरसाट, विवेक पंडित यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक भूषण साटम यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय शिंदे यांनी केले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला
राजकीय

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार
सामाजिक

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा
सामाजिक

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र
देश

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र

ANCHOR AD SLOT