पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी✍️ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ, उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, गृह राज्यमंत्री योगेश कदम, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, खासदार श्रीरंग बारणे आणि पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विविध सामाजिक उपक्रम आणि जलद तपासाच्या माध्यमातून गुन्हे नियंत्रणात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आगामी काळात पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार पुण्यापेक्षाही अधिक होण्याची शक्यता असल्याने भविष्यातील आव्हानांचा विचार करून पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुन्हे नियंत्रण अधिक प्रभावी करावे आणि या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
युवाशक्तीला योग्य दिशा देण्यासाठी अमली पदार्थांविरोधात व्यापक जनजागृती आणि ठोस प्रयत्न होणे आवश्यक आहेत. त्यासाठी घर, परिसर, गाव, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र अमली पदार्थमुक्त करण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस दलाला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. पिंपरी-चिंचवड पोलीस दलाला देण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधा गुन्हे नियंत्रणासोबतच वाहतूक व्यवस्थापनासाठीही उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलिसांना हक्काची घरे आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असून त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी हा महत्त्वाचा दिवस असल्याचे सांगितले. उद्घाटन आणि भूमिपूजन झालेल्या विविध विकास प्रकल्पांमुळे शहराच्या सुरक्षित भविष्याचा मजबूत पाया घातला जात आहे. स्वर्गीय अजित पवार यांनी पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीसाठी १८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीच्या माध्यमातून स्वतंत्र आणि आधुनिक पोलीस मुख्यालय उभारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड पोलीस दलाचे आधुनिकीकरण, गुन्हे नियंत्रण, वाहतूक नियमन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.