सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️: कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यास पात्र नागरिकांना प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी गठित समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेतील विविध प्रकरणे, प्रलंबित अर्ज आणि अभिलेख तपासणीच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष उपेंद्र तामोरे, समिती सदस्य विशाल नाईक, सदस्य सचिव तुषार गवळी, दक्षता पथकाच्या पोलीस उपअधीक्षक प्रतिक्षा खेमनाळकर तसेच पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील उपस्थित होते.
यावेळी कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा प्रवर्गातील प्राप्त अर्जांची संख्या, वितरित करण्यात आलेली जात प्रमाणपत्रे, नामंजूर झालेले प्रस्ताव, दक्षता पथकाकडे प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्तरावरील प्रलंबित अर्जांचा आढावा घेण्यात आला.
कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथील उपविभागीय कार्यालयांकडून जून २०२६ नंतर तपासण्यात आलेल्या नवीन अभिलेखांचीही बैठकीत माहिती घेण्यात आली. या अभिलेखांमध्ये आढळलेल्या अतिरिक्त नोंदी, त्या आधारे नागरिकांकडून विहित नमुन्यात प्राप्त झालेले अर्ज, वितरित करण्यात आलेली प्रमाणपत्रे तसेच अद्याप प्रलंबित असलेल्या अर्जांची सद्यस्थिती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर संबंधित यंत्रणांनी नियमांनुसार आवश्यक कार्यवाही विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी दिल्या. पात्र नागरिकांच्या अर्जांवर नियमानुसार तातडीने कार्यवाही करून प्रलंबित प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
तसेच संबंधित कार्यालयांमधील अभिलेख तपासणी, अर्जांची सद्यस्थिती, जात प्रमाणपत्रांचे वितरण आणि प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.