जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

कुडाळमध्ये २९ डिसेंबरपासून रंगणार लायन्स फेस्टिव्हल; ८५ हून अधिक स्टॉल्सची मांदियाळी!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

कुडाळमध्ये २९ डिसेंबरपासून रंगणार लायन्स फेस्टिव्हल; ८५ हून अधिक स्टॉल्सची मांदियाळी!
“

ऑटो एक्स्पो, इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिव्हलसह तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी; स्थानिक कलाकार आणि गुणवंतांचा होणार सन्मान

कुडाळ प्रतिनिधी✍️: स्थानिक उद्योग-व्यवसायांना प्रोत्साहन, पर्यटनाला चालना आणि सांस्कृतिक कलाविश्वाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग आणि लायन्स सेवा संकुल कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत भव्य लायन्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर रंगणाऱ्या या तीन दिवसीय महोत्सवात ऑटो एक्स्पो, इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिव्हल, विविध वस्तूंचे स्टॉल्स आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि अन्य भागांतील ८५ हून अधिक स्टॉल्स या महोत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती लायन्स सेवा संकुलचे अध्यक्ष अॅड. अमोल सामंत यांनी दिली.




कुडाळ येथील हॉटेल लेमनग्रास येथे शुक्रवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अॅड. अजित भणगे, सीए सुनील सौदागर, अॅड. श्रीनिवास नाईक, सीए सागर तेली, लायन्स क्लबच्या अध्यक्ष स्नेहा नाईक, आनंद कर्पे, डॉ. अमोघ चुबे, अॅड. शेखर वैद्य आदी उपस्थित होते.




अॅड. अमोल सामंत यांनी महोत्सवाच्या वाटचालीची माहिती देताना सांगितले की, लायन्स महोत्सवाची सुरुवात १९९८ मध्ये झाली. गोवा राज्यात अशा प्रकारच्या महोत्सवांचे आयोजन होत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातही स्थानिक व्यवसाय आणि पर्यटनाला चालना देणारा उपक्रम सुरू करण्याच्या हेतूने लायन्स क्लबने इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिव्हलची संकल्पना प्रत्यक्षात आणली. तेव्हापासून या महोत्सवाची परंपरा अखंड सुरू आहे. काही वर्षे लायन्स क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांनी संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन केले. त्यानंतर दोन्ही संस्थांकडून एक वर्षाआड महोत्सव आयोजित करण्याची पद्धत सुरू झाली. यंदा आयोजनाची जबाबदारी लायन्स क्लबकडे असून महोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून लायन्स पदाधिकारी गणेश म्हाडदळकर काम पाहत आहेत.




२९, ३० आणि ३१ डिसेंबर या तिन्ही दिवशी सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत महोत्सव सुरू राहणार आहे. ऑटो एक्स्पोबरोबरच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, औद्योगिक उत्पादनांचे तसेच विविध वस्तूंचे स्टॉल्स येथे असणार आहेत. स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी देतानाच जिल्ह्यातील पर्यटन, उद्योग आणि व्यावसायिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा या महोत्सवाचा मुख्य हेतू असल्याचे अॅड. सामंत यांनी स्पष्ट केले. या उपक्रमाला आमदार निलेश राणे यांचेही सहकार्य लाभणार आहे.




अॅड. अजित भणगे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती देताना सांगितले की, महोत्सवाच्या पहिल्या आणि तिसऱ्या दिवशी जिल्ह्याबाहेरील कलाकारांचे कार्यक्रम सादर होणार आहेत, तर दुसरा दिवस स्थानिक कलाकारांसाठी राखीव असेल. सिंधुदुर्गच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्यासोबतच स्थानिक कलावंतांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. याशिवाय जिल्ह्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्यात येणार असून मान्यवरांचाही सन्मान केला जाणार आहे.




सीए सागर तेली यांनी महोत्सवाचा दर्जा आणि त्याचे वेगळेपण कायम राखण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले. विविध प्रकारच्या स्टॉल्ससोबतच स्थानिक आणि बाहेरील नामांकित कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. कुडाळमधील उद्योजक, व्यावसायिक आणि नागरिकांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम दरवर्षी यशस्वी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.




अॅड. शेखर वैद्य यांनी सांगितले की, महोत्सवासाठी आतापर्यंत जवळपास ६० टक्के स्टॉल्सचे बुकिंग पूर्ण झाले आहे. यंदा ८५ हून अधिक स्टॉल्स सहभागी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे खरेदीची संधी, विविध खाद्यपदार्थांची चव, औद्योगिक उत्पादनांची माहिती आणि मनोरंजनाची मेजवानी असा बहुरंगी अनुभव नागरिकांना मिळणार आहे. उद्योग, व्यवसाय, खाद्यसंस्कृती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा संगम असलेला हा लायन्स फेस्टिव्हल कुडाळसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
सामाजिक

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!
आंतरराष्ट्रीय

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती
प्रशासन

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!
शैक्षणिक

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!

ANCHOR AD SLOT