कुडाळ प्रतिनिधी✍️: शहरातील कचरा डम्पिंगचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाच कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या सहा घंटागाड्या गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या घंटागाड्यांच्या दुरुस्तीबाबत अहवाल सादर करण्याचा निर्णय तीन महिन्यांपूर्वीच्या नगर पंचायतच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. मात्र, अद्यापही हा अहवाल सभेसमोर सादर करण्यात आलेला नसल्याने आज झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. यावर आठ दिवसांत विशेष सभा घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे मुख्याधिकारी खंडू पोवळ यांनी स्पष्ट केले.
कुडाळ नगर पंचायतची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी खंडू पोवळ, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सभेत एक ४०७ वाहन आणि एका घंटागाडीच्या खरेदीचा विषय चर्चेला आला. त्यावेळी सध्या नादुरुस्त असलेल्या घंटागाड्यांचे काय झाले, असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. शहरातील तब्बल सहा घंटागाड्या विविध ठिकाणी बंद अवस्थेत असून, त्यांच्या दुरुस्तीबाबतचा अहवाल सभेसमोर सादर करण्याचे तीन महिन्यांपूर्वी ठरले होते, याची आठवण नगरसेवक मंदार शिरसाट यांनी करून दिली. तीन महिने उलटूनही अहवाल सादर न झाल्याने सर्वच नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.
घंटागाड्यांच्या दुरुस्तीचा खर्च व बिले कोण अदा करणार, यावरही सभेत चर्चा झाली. उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी याबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. तर घंटागाड्या बंद असल्याची माहिती नगरसेवकांना विश्वासात घेऊन का देण्यात आली नाही, असा सवाल नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी केला. यावर आठ दिवसांत विशेष सभा घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल, असे मुख्याधिकारी खंडू पोवळ यांनी सांगितले.
दरम्यान, शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत असताना फॉगिंग मशीनच्या प्रभागनिहाय वापराचे योग्य नियोजन होत नसल्याचा मुद्दाही सभेत उपस्थित झाला. उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी याबाबत प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ फोटो काढून फॉगिंग केल्याचे दाखविण्याऐवजी नागरिकांना प्रत्यक्ष फायदा होईल, अशा पद्धतीने सर्व प्रभागांमध्ये फॉगिंग करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. नगर पंचायतचा आरोग्य विभाग उदासीन का, असा सवाल करत प्रत्येक प्रभागात फॉगिंग मशीनचा समान वापर करण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
एमआयडीसी येथील घनकचरा प्रकल्प, तेथे उभारण्यात येणारे शेड व बसविण्यात येणारी यंत्रसामग्री याबाबतही सभेत चर्चा करण्यात आली. नगर पंचायतची वाहने धुण्यासाठी सर्व्हिसिंग पंप घेणे, रस्त्यावरील कचरा हटविण्यासाठी ब्लोअर खरेदी करणे तसेच जेसीबी खरेदी करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
शहरातील ५५ ठिकाणी विद्युत खांब असूनही तेथे पथदिवे नसल्याची बाब बैठकीत समोर आली. याबाबतही सभेत चर्चा करण्यात आली. तसेच शहरात नोंदणीकृत असलेल्या २३४ पथविक्रेत्यांना जागा व ओळखपत्र देताना स्थानिक विक्रेत्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभेच्या अखेरीस मुख्याधिकारी खंडू पोवळ यांनी आपल्या नियुक्तीबाबत स्पष्टीकरण दिले. आपल्या नियुक्तीबाबत चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती पसरवू नये, असे आवाहन त्यांनी केले. आपली नियुक्ती ऑक्टोबर २०२६ पर्यंत असली तरी आदेशामध्ये ‘पुढील आदेश येईपर्यंत’ असा पर्यायही नमूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नियुक्तीच्या मुदतीबाबत कोणीही चुकीची माहिती देऊ नये, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या स्पष्टीकरणाला नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनीही दुजोरा दिला.