कुडाळ प्रतिनिधी✍️: शेतकऱ्यांसाठी सध्या आवश्यक ठरत असलेल्या ‘फॉर्मर आयडी’ (Farmer ID) काढताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेषतः एकाच शेतकऱ्याच्या जमिनी वेगवेगळ्या गावांमध्ये असतील, तर इतर गावांतील जमिनीची नोंद फॉर्मर आयडीमध्ये करताना अडचणी निर्माण होत आहेत. या समस्येची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सदस्य रुपेश अशोक पावसकर यांनी कुडाळ तहसीलदारांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची मागणी केली आहे.
सध्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फॉर्मर आयडी काढणे आवश्यक ठरत आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी एकाच गावात नसून वेगवेगळ्या गावांच्या हद्दीत आहेत. एकाच गावातील जमीन फॉर्मर आयडीमध्ये नोंदविताना विशेष अडचण येत नसली, तरी अन्य गावांमध्ये असलेल्या जमिनींची नोंदणी करताना तांत्रिक अडथळे निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्याकडे अडचणी आणि तक्रारी मांडल्या होत्या. शेतकऱ्यांना फॉर्मर आयडी काढताना कोणतीही अडचण येऊ नये, तसेच त्यांच्या सर्व जमिनींची योग्य पद्धतीने नोंद होऊन शासकीय योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी प्रशासनाने आवश्यक मार्गदर्शन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या या समस्येची दखल घेत रुपेश पावसकर यांनी कुडाळ तहसीलदारांना निवेदन सादर केले. फॉर्मर आयडी नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा तातडीने निपटारा करून संबंधित शेतकऱ्यांना योग्य ती माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.