वेंगुर्ले स्वरूपा सौदागर✍️ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील विविध भागांत पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वीजवाहिन्या तसेच विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. परिणामी काही गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून, वीज वितरण यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.
वेंगुर्ले तालुक्यात शुक्रवारी आणि शनिवारी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. दुपारनंतर आणि सायंकाळच्या सुमारास वाऱ्याचा वेग वाढल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर काही ठिकाणी मोठी झाडे मुळासकट उन्मळून रस्त्यावर कोसळली. त्यामुळे गावांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. नागरिकांना तसेच वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला.
वादळी वाऱ्यामुळे वीजवाहिन्यांवर झाडे कोसळल्याने काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी विद्युत खांबांचेही नुकसान झाल्याने वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली असून, अनेक भागांतील दैनंदिन व्यवहारांवरही त्याचा परिणाम झाला.
दरम्यान, या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी भातपीक कापणीच्या अवस्थेत असून, काही शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली आहे. हातातोंडाशी आलेले पीक अचानक आलेल्या पावसामुळे भिजल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. शेतात उभे असलेले भातपीक वाऱ्यामुळे आडवे होण्याची शक्यता असून, कापणी केलेले भातही पावसात भिजण्याची भीती निर्माण झाली आहे.
यंदाच्या हंगामात मोठ्या मेहनतीने घेतलेल्या भातपिकाच्या कापणीच्या तोंडावरच पावसाने जोर धरल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. पावसाचा जोर आणखी वाढल्यास शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही शेतकरी वर्गातून होत आहे.
एकीकडे वादळी पाऊस, दुसरीकडे खंडित झालेला वीजपुरवठा आणि तिसरीकडे हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे नुकसान, अशा तिहेरी संकटामुळे जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतीसह ग्रामीण भागातील जनजीवनावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.