कणकवली प्रतिनिधी✍️ : सिंधुदुर्ग जिल्ह्याला शाश्वत आणि रोजगाराभिमुख विकासाची गरज असताना सत्ताधाऱ्यांकडून कोणतेही ठोस व्हिजन न ठेवता बोगस प्रकल्प आणण्याचे काम सुरू आहे. पालकमंत्री नितेश राणे जिल्ह्यात विविध प्रकल्प आणून त्यातून १० टक्के कमिशन मिळविण्याचे काम करीत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख तथा उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केला.
राणे कुटुंबीयांची गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणावर सत्ता असतानाही स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळेल, असा शाश्वत विकास झालेला नाही, अशी टीकाही नाईक यांनी केली. कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख राजू राठोड, नाटळ विभागप्रमुख गुरुनाथ पेडणेकर आदी उपस्थित होते.
मिठमुंबरी-बागवाडी येथील जेटीवर प्रस्तावित कायकिंग पर्यटन प्रकल्पाला स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांचा विरोध आहे. या प्रकल्पामुळे पारंपरिक मासेमारीवर परिणाम होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. प्रकल्पाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव आणून ग्रामस्थ आणि मच्छीमारांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडल्याचा आरोप नाईक यांनी केला.
या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थ आणि मच्छीमारांच्या पाठीशी ठाकरे शिवसेना ठामपणे उभी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिकांची भूमिका जाणून घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता ग्रामस्थांवर अन्याय करण्यात आल्याचे नाईक म्हणाले.
बंद पडलेल्या प्रकल्पांबाबत सत्ताधाऱ्यांनी उत्तर द्यावे
देवगडमध्ये सुरू करण्यात आलेले वॅक्स म्युझियम तसेच रो-रो सेवेसारखे प्रकल्प बंद पडले आहेत. या प्रकल्पांचे काय झाले, याबाबत पालकमंत्री का बोलत नाहीत? असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला. जिल्ह्याच्या विकासाच्या नावाखाली केवळ घोषणा करून उपयोग नसून प्रकल्पांची प्रत्यक्ष स्थितीही तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय रुग्णालयांची दुरवस्था
कणकवली विधानसभा मतदारसंघातील शासकीय रुग्णालयांची परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याचा आरोपही नाईक यांनी केला. योग्य उपचार आणि आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना गोवा तसेच अन्य ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे. शासकीय रुग्णालयांची स्थिती सुधारण्यात पालकमंत्री अपयशी ठरले असून सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा कधी मिळणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुगणे अणुऊर्जा प्रकल्पावरूनही सवाल
मुगणे येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असतानाही दिल्लीतील नेत्यांच्या दबावामुळे हा प्रकल्प स्थानिकांवर लादण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नाईक यांनी केला. स्थानिक जनतेची भूमिका आणि त्यांच्या हिताचा विचार करूनच विकास प्रकल्प राबविले गेले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
कणकवली कचरा प्रकल्पावरून टोला
कणकवली शहरातील कचरा प्रकल्पाबाबतही पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, हा प्रकल्प शहरात यशस्वी होणार नाही, असे आम्ही यापूर्वीच स्पष्ट केले होते, असे नाईक म्हणाले. लंडनमध्ये शिक्षण घेतलेल्या पालकमंत्र्यांना कचरा प्रकल्पाच्या यशस्वितेबाबत समजत नसले, तरी स्थानिक नागरिकांना त्याची जाणीव आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
ओरोस-देवगड नव्या मार्गाच्या घोषणेवरही आक्षेप
ओरोस ते देवगड हे अंतर कमी करण्यासाठी नवीन रस्त्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली आहे. मात्र, काही ठेकेदारांच्या सल्ल्यानुसार हा मार्ग प्रस्तावित करण्यात आल्याचा दावा नाईक यांनी केला. या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, प्रत्यक्षात मार्ग तयार झाल्यानंतरही ओरोस ते देवगड प्रवासासाठी अधिक वेळ लागू शकतो, असा दावा त्यांनी केला.
जिल्ह्याच्या विकासाच्या नावाखाली केवळ नवनवीन प्रकल्पांची घोषणा करण्याऐवजी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. रोजगारनिर्मिती, सक्षम आरोग्य सुविधा आणि पारंपरिक व्यवसायांना पूरक ठरणारा शाश्वत विकास हाच जिल्ह्याच्या भविष्यासाठी योग्य मार्ग आहे, अशी भूमिका सुशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत मांडली.