जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

युवासेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर; कणकवलीत पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

दादा सारंग • 25 November 2026, 10:24 AM

कणकवली प्रतिनिधी✍️ : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच युवकांचे प्रश्न प्रभावीपणे सोडविण्याच्या उद्देशाने युवासेनेच्या कणकवली तालुका कार्यकारिणीची बैठक विजय भवन येथे पार पडली. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आणि तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत आगामी निवडणुका, संघटनात्मक बांधणी, आंदोलने, सामाजिक उपक्रम तसेच नवमतदार नोंदणी मोहिमेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.




युवासेनेची संघटना शाखा आणि वॉर्ड स्तरावर अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी कार्यकारिणी सक्रिय करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. नवमतदार नोंदणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली. तसेच जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यावर विशेष भर देण्यात आला.




यावेळी मार्गदर्शन करताना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सांगितले की, युवकांच्या रोजगार आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर युवासेनेने सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. आगामी काळात सर्वसामान्य तरुणांशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेणे, युवकांना संघटनेशी जोडणे आणि संघटनेची ताकद वाढविणे आवश्यक आहे.




तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनीही संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. बाळासाहेब ठाकरे यांचा ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा विचार अंगीकारून युवासैनिकांनी समाजहितासाठी कार्यरत राहावे, असे त्यांनी सांगितले.




या बैठकीला युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, उपशहरप्रमुख प्रतीक रासम, विभागप्रमुख किरण वर्डम, नंदकिशोर परब, निकेतन भिसे, विजय गावकर, उमेश गावडे, निलेश रावराणे, वैभव मुरकर, गुरुनाथ पेंडणेकर, सतीश परब, सतीश मर्गज, संदीप गावकर, इमाम बटावले, रमेश राणे, श्रीराम गुरव, सिद्धेश गावकर, रोशन गुरव, सत्यवान गावकर, प्रवीण गुरव, प्रवीण गावकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)