जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

वनराई बंधाऱ्यांमुळे जलसंधारणाच्या प्रयत्नांना बळ खासदार नारायण राणे

दादा सारंग • 01 November 2026, 01:57 PM

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️: जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन आणि ग्रामस्थांच्या सहभागातून राबविण्यात आलेली जलसंधारण मोहीम उल्लेखनीय आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यात १० हजारांहून अधिक वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अडवून जलसंधारण करण्याच्या प्रयत्नांना मोठी मदत होत असल्याचे मत खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले.




कणकवली तालुक्यातील हुंबरट येथे जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ जवळ ग्रामपंचायतीच्या वतीने बांधण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्याची खासदार नारायण राणे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. लोकसहभागातून अशा प्रकारचे अधिकाधिक बंधारे उभारल्यास आगामी काळातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यास निश्चितच मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.




जलसंधारणाच्या कामात प्रशासनाबरोबरच स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनीही सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्याच्या अशा उपक्रमांमुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होईल. परिणामी भविष्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी या प्रयत्नांचा उपयोग होणार असल्याचे खासदार राणे यांनी सांगितले.




यावेळी कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी प्रमोद ठाकूर, उपसरपंच नितीन बागवे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, संतोष चव्हाण, सदस्य संदीप होळकर, नितीका बागवे, पोलीस पाटील बाबू गुरव, कोतवाल प्रदीप जाधव, गणेश गुरव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)