जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

दुर्मिळ ‘रामसेतू शिले’चे दर्शन आता सावंतवाडीत घेता येणार

दादा सारंग • 26 October 2026, 06:34 AM

सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : सावंतवाडी येथील श्री औदुंबर स्वामी मंदिरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच भाविकांना दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या ‘रामसेतू शिले’चे कायमस्वरूपी दर्शन घेता येणार आहे. या रामशिलेचे लोकार्पण गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता शिवसेनेचे युवा नेते तथा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान आयोजित आरतीमध्ये आमदार निलेश राणे सहभागी होणार असून, मंदिर उभारणीसाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांसह दात्यांचा सन्मानही त्यांच्या हस्ते केला जाणार आहे. स्वामीभक्त अमोल टेंबकर यांनी आपल्या पूज्य आई-वडील सौ. मंदा मंगेश टेंबकर यांच्या स्मरणार्थ ही रामशिला मंदिराला अर्पण केली आहे.

रामायण काळात प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकेकडे जाण्यासाठी समुद्रावर उभारलेल्या ऐतिहासिक रामसेतूचा हा एक भाग असल्याचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, वानरसेनेने या पाषाणांवर ‘श्रीराम’ नाम लिहिल्यानंतर ते दगड समुद्राच्या पाण्यावर तरंगू लागले होते. रामेश्वरम परिसरातील समुद्रात आढळणाऱ्या या पाषाणाचे पाण्यावर तरंगणे हे त्याचे वैशिष्ट्य मानले जाते.

या रामशिलेच्या दर्शनातून प्रभू श्रीरामांच्या पराक्रमाची आणि श्रद्धेची अनुभूती घेता येते, अशी भाविकांची भावना आहे. आता श्री औदुंबर स्वामी मंदिरात येणाऱ्या भाविकांना या रामशिलेचे दर्शन घेण्यासोबतच तिला स्पर्श करून अनुभव घेण्याची संधी कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे.

या अनोख्या रामशिलेचे दर्शन घेण्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी मंदिरात उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)