जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

ठाण्यात राजकीय घडामोडींना वेग; मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा

दादा सारंग • 01 November 2026, 04:47 AM

ठाणे प्रतिनिधी✍️: ठाण्यातील राजकीय वातावरणात शुक्रवारी मोठ्या घडामोडी घडल्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात दाखल होत पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना तातडीने अटक करण्याची मागणी केली.




या घडामोडी सुरू असतानाच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ‘ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख’ पदाचा राजीनामा दिला. विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांमुळे पक्ष आणि पक्षाच्या नेतृत्वाची विनाकारण कोंडी होऊ नये, या कारणास्तव आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, आपल्यावर करण्यात आलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत.




आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्य सूत्रधारांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केल्याचे सांगण्यात आले.




दरम्यान, मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे ठाण्यातील राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना गटांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाल्याचे चित्र आहे. नेते आणि कार्यकर्ते आमनेसामने येत असल्याने शहरातील राजकीय वातावरणाबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दाही चर्चेत आला आहे.




पूर्णेकर हत्या प्रकरणातील तपास, त्यावरून सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप आणि मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा यामुळे ठाण्यातील राजकारणात पुढील काळात आणखी घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)