जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

पिंगुळी पाझर तलावाच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांच्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा

दादा सारंग • 30 October 2026, 12:05 PM

कुडाळ प्रतिनिधी✍️: पिंगुळी गावातील शासकीय पाझर तलावाच्या संरक्षणासाठी स्थानिक ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या आंदोलनाला आणि उपोषणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतची माहिती माजी आमदार परशुराम उपरकर आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.




पिंगुळी येथील शासकीय पाझर तलावाच्या काठालगत एका गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरणावर परिणाम होत असून, तलावाची जमीन स्वमालकीची असल्याचे दाखवून प्लॉट विक्रीची जाहिरात केली जात असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.




पिंगुळी गावातील सुमारे १ हजार ८५० नळधारक ग्रामस्थ या तलावातील पाण्यावर अवलंबून असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पातील सांडपाणी तलावात मिसळल्यास पाण्याचा मुख्य स्रोत प्रदूषित होण्याची शक्यता असून, भविष्यात ग्रामस्थांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली.




या पार्श्वभूमीवर पिंगुळीतील ग्रामस्थांनी २ नोव्हेंबर २०२६ पासून आंदोलन आणि उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांच्या या भूमिकेला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असून, पाझर तलावाचे संरक्षण आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे जतन करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.




यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट, काँग्रेसचे विजय प्रभू, सचिन ठाकूर, बाबल गावडे, दीपक गावडे, राजेश टंगसाळी आदी उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)