जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

‘भाजपा श्री २०२६’च्या व्यासपीठावर विशाल परब यांच्या वक्तृत्वाची रंगत

दादा सारंग • 02 November 2026, 04:08 AM

सावंतवाडी प्रतिनिधी : शरीरसौष्ठवाच्या मैदानात स्पर्धकांनी आपल्या पीळदार शरीरयष्टीचे आणि मेहनतीचे दर्शन घडविले; मात्र याच व्यासपीठावर युवा नेते विशाल परब यांच्या भाषणाने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली. भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने आणि भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून जगन्नाथराव भोसले शिव उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या ‘भाजपा श्री २०२६’ शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्ताने विशाल परब यांनी तब्बल नऊ मिनिटे उपस्थितांशी संवाद साधला.




सामान्यतः कार्यक्रमांमध्ये मोजक्या शब्दांत मनोगत व्यक्त करणारे विशाल परब यांनी यावेळी आपल्या भाषणातून विविध विषयांना स्पर्श केला. वरिष्ठांचा सन्मान, सहकाऱ्यांप्रती आदर, युवा पिढीसाठी नव्या संधी निर्माण करण्याची गरज तसेच सावंतवाडी मतदारसंघाच्या विकासाचा दृष्टिकोन यावर त्यांनी भाष्य केले.




विनोद राऊळ यांच्या उल्लेखाने हास्यकल्लोळ




विशाल परब यांच्या भाषणातील विनोद राऊळ यांच्या उल्लेखाचा प्रसंग विशेष चर्चेचा ठरला. कार्यक्रमाचे निवेदक विनोद राऊळ यांची तुलना ‘गदर’ चित्रपटातील सनी देओल यांच्या भूमिकेशी करत ‘एक घाव दोन तुकडे’ असा उल्लेख केला होता. त्याच संदर्भाचा आधार घेत विशाल परब यांनी मिश्किल शैलीत विनोद राऊळ यांच्याबाबत ‘एक घाव दोन तुकडे नव्हे, तर ४५ तुकडे करण्याची ताकद असलेले नेते’ असा उल्लेख केला.




तसेच विनोद राऊळ यांच्या आशीर्वादाचा आणि पाठिंब्याचा आधार मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. या वक्तव्याने उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ निर्माण झाला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.




अनिल निरवडेकर यांच्या विकासाच्या भूमिकेवर भाष्य




यानंतर विशाल परब यांनी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचाही आपल्या भाषणात उल्लेख केला. ‘नायक’ चित्रपटातील अनिल कपूर यांच्या भूमिकेचा संदर्भ देत त्यांनी सावंतवाडी शहराच्या विकासाची मोठी संधी अनिल निरवडेकर यांच्यासमोर असल्याचे सांगितले.




पुढील चार वर्षांत शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारी विकासकामे करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्याचे सांगत, ते ही संधी योग्य पद्धतीने साधतील, अशी अपेक्षाही विशाल परब यांनी व्यक्त केली.




युवकांसाठी अधिक व्यासपीठे उभारण्याचा मानस




सिंधुदुर्गातील युवकांना कला, क्रीडा, कौशल्य आणि त्यांच्या विविध क्षमतांना वाव मिळावा, यासाठी अधिकाधिक व्यासपीठे उपलब्ध करून देण्याची भूमिका विशाल परब यांनी मांडली. ‘भाजपा श्री २०२६’च्या आयोजनामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन असल्याचे त्यांनी नमूद केले.




यापुढील काळातही अशाच स्वरूपाच्या भव्य स्पर्धांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त करताना, आगामी काळात दोडामार्ग तालुक्यातही शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.




शरीरसौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद




या कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विनोद राऊळ, सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नगरसेवक-नगरसेविका, भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सावंतवाडी शहर आणि तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी आणि निलेश गुरव यांनी केले, तर नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी आभार मानले.




शरीरसौष्ठवपटूंचे सादरीकरण, क्रीडाप्रेमींचा उत्साह आणि त्याचवेळी विशाल परब यांच्या नऊ मिनिटांच्या भाषणामुळे ‘भाजपा श्री २०२६’ स्पर्धेचा सोहळा रंगतदार ठरला. शरीरसौष्ठवाच्या स्पर्धेसोबतच विशाल परब यांच्या भाषणातील विनोदी संदर्भ आणि विकासविषयक मांडणीचीही उपस्थितांमध्ये चर्चा झाली.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)