जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
शैक्षणिक

यशस्वी जीवनासाठी निश्चित ध्येय ठेवा; समाधानाला संपत्तीपेक्षा अधिक महत्त्व द्या कुलगुरू डॉ. संजय भावे

दादा सारंग • 23 November 2026, 05:52 PM

कुडाळ प्रतिनिधी✍️ : जीवनात यशस्वी होण्यासाठी निश्चित ध्येय डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करणे गरजेचे आहे. आयुष्य समृद्ध करण्यासाठी केवळ संपत्ती महत्त्वाची नसून समाधानालाही तितकेच महत्त्व आहे. चरितार्थासोबत चारित्र्य जपणे आवश्यक असून, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आई-वडील आणि गुरुजनांचे योगदान लक्षात ठेवले पाहिजे, असा मोलाचा संदेश डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी दिला.




हुमरमळा-कुडाळ येथील श्री. पुष्पसेन ज्ञानपीठ संचलित पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजच्या वतीने आयोजित पदवीदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या समारंभात ६६ पदवीधर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी फार्मासिस्टची शपथ घेऊन आपल्या व्यावसायिक वाटचालीला नवी सुरुवात केली.




या कार्यक्रमाला सिंधुदुर्गचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भुपतसेन सावंत, परिसर संचालिका नूतन परब, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. युवराज पांढरे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग लंगुटे आणि नर्सिंग स्कूलचे प्राचार्य ओंकार गरड यांची प्रमुख उपस्थिती होती.




यावेळी विजय काळे, भुपतसेन सावंत आणि नूतन परब यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश करताना ज्ञानासोबतच प्रामाणिकपणा, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.




पदवीदान समारंभानंतर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणींसह व्यावसायिक क्षेत्रातील आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. तसेच नव्याने पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी प्रेरित केले.




या कार्यक्रमाला आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदवी प्रमाणपत्रांचे वितरण आणि माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवांच्या देवाणघेवाणीमुळे हा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)