वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : शेतीमध्ये प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळावी आणि त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा, या उद्देशाने लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ला यांच्या वतीने महिला शेतकरी प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वेंगुर्ले नगरपरिषद आणि अनुलोम संस्थेच्या सहकार्याने आयोजित या शिबिराला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. तब्बल २४९ महिलांनी या शिबिरात सहभागी होत शेतकरी प्रमाणपत्रासाठी आवश्यक प्रक्रियेची माहिती घेतली.
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात झालेल्या या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास गवडळकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, मंडळ कृषी अधिकारी प्रकाश मोहिते, उपकृषी अधिकारी संदीप देसाई, सहाय्यक कृषी अधिकारी स्नेहल रगजी, सभापती गौरी माईणकर, सभापती गौरी मराठे, नगरसेवक रवींद्र शिरसाठ, सचिन शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष राजन गिरप यांनी शेतीमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत मान्यता मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. शहरी भागात राहून शेती करणाऱ्या महिलांपर्यंत शासनाच्या कृषीविषयक योजना आणि सुविधांची माहिती पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे. या उपक्रमांना नगरपरिषदेकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मंडळ कृषी अधिकारी प्रकाश मोहिते यांनी महिला शेतकरी प्रमाणपत्राचे महत्त्व, त्यासाठी आवश्यक पात्रता आणि ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सातबारा उताऱ्यावर स्वतःचे नाव नसले तरी प्रत्यक्ष शेतीशी संबंधित असलेल्या महिलांनी प्रमाणपत्रासाठीच्या प्रक्रियेची माहिती घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
शहरी भागात वास्तव्यास असलेल्या अनेक महिला प्रत्यक्ष शेती तसेच शेतीपूरक व्यवसायांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतात. मात्र, सातबारा उताऱ्यावर स्वतःचे नाव नसल्यामुळे त्यांची शेतकरी म्हणून अधिकृत नोंद झालेली नसते. त्यामुळे शेतकरी प्रमाणपत्र मिळविण्याबाबत अनेक महिलांमध्ये संभ्रम असतो. हा संभ्रम दूर करून शेतीत योगदान देणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देण्याच्या हेतूने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्राचे महत्त्व, ऑनलाइन अर्ज भरण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे व नोंदणी करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत माहिती दिली. तसेच उपस्थित महिलांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करण्यात आले. आधार कार्ड, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक आणि शेती अथवा शेतीपूरक व्यवसायातील सहभागाची माहिती यांच्या आधारे नोंदणी प्रक्रिया समजावून सांगण्यात आली.
या कार्यक्रमाला लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती प्रसन्ना देसाई, सचिव वृंदा विनायक गवंडळकर, खजिनदार डॉ. दीपाली देसाई, सदस्य शुभदा नवार, अनुलोमच्या श्रीहर्षा टेगशे, बाजीराव काळे, प्रथमेश रेडकर, कृषी सखी गार्गी होडावडेकर आणि मयुरी दाभोलकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. सचिन वासुदेव परुळकर यांनी केले. महिला शेतकरी प्रमाणपत्र शिबिराला मिळालेला २४९ महिलांचा प्रतिसाद हा शेतीमध्ये महिलांच्या योगदानाला अधिकृत ओळख मिळवून देण्याबाबत वाढत असलेल्या जागरूकतेचे द्योतक ठरला.